देशातील 64 हजार व्यक्ती झाल्या बेरोजगार

पाच वाहन कंपन्यांचे प्रकल्प झाले बंद

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: मागील पाच वर्षात पाच मोठ्या बहुराष्ट्रीय वाहन कंपन्यांनी भारत सोडल्यामुळे ६४ हजार जणांना रोजगार गमवावा लागला आहे. तसेच वाहन वितरकांच्या (डीलर) २,४८५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर पाणी फिरले आहे. ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर असोसिएशनने (फाडा) केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाला पाठविलेल्या एका पत्रात ही माहिती देण्यात आली आहे.

सहा मोठ्या बहुराष्ट्रीय वाहन कंपन्या व ब्रँड्सनी भारत सोडला

२०१७ पासून एकूण सहा मोठ्या बहुराष्ट्रीय वाहन कंपन्या व ब्रँड्सनी भारत सोडला आहे. त्यातील पाच कंपन्यांच्या एक्झिटचा सर्वाधिक फटका बसला आहे. फोर्ड, जनरल मोटर्स, मान ट्रक्स, फियाट, हार्ले डेव्हिडसन, यूएम मोटारसायकल्स आणि आयशर – पोलारिस जाइंट व्हेंचर यांचा त्यात समावेश आहे. ४६४ वितरकांना त्याचा फटका बसला आहे.

वाहन उद्योगातील रिटेल क्षेत्रास मोठा फटका

फाडाचे अध्यक्ष व्यंकटेश गुलाटी यांनी सांगितलं की, बहुराष्ट्रीय वाहन कंपन्यांनी अचानक भारत सोडल्यामुळे वाहन उद्योगातील रिटेल क्षेत्रास मोठा फटका बसला आहे. ग्राहकांचंही मोठं नुकसान झालं. ज्यांच्याकडे या कंपन्यांच्या गाड्या आहेत, त्यांना विक्री पश्चात सेवा कशी मिळेल, हा प्रश्न निर्माण झाला आहे. फाडाचे हे पत्र अवजड उद्योगमंत्री महेंद्रनाथ पांडे यांना उद्देशून लिहिण्यात आले आहे. वाहन वितरकांच्या हिताचे संरक्षण करण्याची विनंती पत्रात करण्यात आली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!