भीषण! शिवमोगामध्ये स्फोट; 8 जणांचा मृत्यू

मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

बंगळुरू : कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यात हुनासोंडी येथे गुरूवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटाची तिव्रता मोठी होती, की स्फोटके वाहून नेणाऱ्या ट्रकचे तुकडे-तुकडे झाले आहेत. तसंच परिसरातील इमारतींना तडे गेले. घराच्या काचा तुटल्या. शेजारच्या चिकमंगळूर जिल्ह्यातही याचे हादरे जाणवले. भूकंप किंवा बॉम्बस्फोट झाल्याची अफवा उडाल्यानं लोक घाबरून गेले. अनेकांनी घरं सोडून मोकळ्या मैदानात धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच बॉम्बनाशक पथक घटनास्थळी संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.

कशामुळे झाला स्फोट?

कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यातील दगडखाणीजवळ एका ट्रकमध्ये हा स्फोट झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. खाणीतील दगड फोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्फोटकांमुळं हा स्फोट झाला. या ट्रकमधून काही जण जिलेटीनच्या काड्या घेऊन जात होते.

स्फोटात जवळपास ८ जणांचा मृत्यू

या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिवमोगा हा गृह जिल्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचा आहे. स्फोटकं ट्रकमध्ये होती की ट्रकच्या बाजुला याचा शोध अद्याप सुरू असल्याचं एडीजीपी प्रताप रेड्डी यांनी म्हटलंय.

पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला

या घटनेनंतर राज्य सरकार पीडितांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ‘या दुर्घटनेबद्दल ऐकून प्रचंड वेदना झाल्या. पीडित कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.’ असं ट्वीट करत त्यांनी शोक व्यक्त केला.

मृतांमध्ये ट्रकमधून स्फोटके वाहून नेणाऱ्या कामगारांचा समावेश आहे. जिलेटिनच्या काही कांड्या अद्यापही तिथं असल्यानं आणखीही काही स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!