काळीज जळलं! करोनामुळे तीन महिन्यात देशभरातील 577 मुलं झाली अनाथ

महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणींची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः करोनामुळे पालकांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात गेल्या तीन महिन्यात 577 मुलं अनाथ झाली असून डोक्यावरील पालकांचं छत्र हरवलं आहे. महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी ही माहिती दिली आहे. ही 1 एप्रिलपासूनची आकडेवारी असून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून गोळा करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. करोनामुळे आई आणि वडील दोघांनाही गमावलेल्या प्रत्येक असहाय्य मुलाला पाठिंबा तसंच संरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.

हेही वाचाः ‘इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड’ कोवॅक्सीन लसीसाठीच्या औषधाचे उत्पादन करणार

577 मुलं झाली अनाथ

भारत सरकार करोनामुळे आपले दोन्ही पालक गमावलेल्या असहाय्य मुलांना पाठिंबा आणि संरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. 1 एप्रिल ते 26 मे दुपारी २ वाजेपर्यंत, राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या माहितीनुसार 577 मुलांनी आपल्या पालकांना करोनामुळे गमावल्याची माहिती दिली आहे, असं स्मृती इराणी यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अख्त्यारित मुलं सुरक्षित

या मुलांना वाऱ्यावर सोडलं जात नसून जिल्हा प्रशासनाच्या अख्त्यारित सुरक्षा दिली जात असून लक्ष ठेवलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर अशा मुलांना समुपदेशन हवं असेल तर नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स (NIMHANS) त्यासाठी तयार आहे.

हेही वाचाः प्रिन्स ॲरॉन गोल्डनला बाल न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

निधीची कमतरता नाही

दरम्यान या मुलांची देखभाल करण्यासाठी निधी कमी नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. मुलांसंबंधी केंद्र सरकार सतत राज्यं आणि जिल्ह्यांसोबत संपर्कात आहे. त्यांच्या कल्याणासाठी निधीची अजिबात कमतरता नाही. महिला आणि बालकल्याण मंत्रालयाची सर्व भागधारकांसोबत बैठक पार पडली आहे. यामध्ये युनिसेफचाही समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचाः कॅसिनो कंपनी म्हणते कर्फ्यू वाढणार ?

दरम्यान महिला आणि बालकल्याण मंत्रालय करोनामुळे पालक गमावलेल्या मुलांची माहिती मागत असतानाही अनाथ मुलांबद्दल चर्चा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून ती मिळत नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!