राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सुखोई फायटर जेटमधून गगन भरारी
द्रौपदी मुर्मू यांच्या आधी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम, प्रतिभा पाटील आणि रामनाथ कोविंद यांनी हवाई दलाच्या लढाऊ विमानांतून उड्डाण केले आहे.

ऋषभ | प्रतिनिधी
गुवाहाटी: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवार दि. 8 एप्रिल 2023 रोजी आसाममधील तेजपूर हवाई तळावरून भारतीय हवाई दलाच्या Su-30 MKI या लढाऊ विमानाने ऐतिहासिक उड्डाण केले. त्या ६ एप्रिलपासून आसामच्या दौऱ्यावर असून, राष्ट्रपतींच्या आसाम दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी 2009 मध्ये उड्डाण केले होते
भारतीय सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर असल्याकारणाने राष्ट्रपतींना सैन्य, शस्त्रे आणि धोरणे यांची माहिती दिली जाते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आधी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम, प्रतिभा पाटील आणि रामनाथ कोविंद यांनी हवाई दलाच्या लढाऊ विमानांतून उड्डाण केले आहे. देशाच्या या अत्याधुनिक लढाऊ विमानात माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी २००९ मध्ये उड्डाण केले होते.
शत्रू देशांना कडक संदेश
सध्या चीनच्या सीमेवर भारतीय लष्कराला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. चीनकडून वारंवार घुसखोरीचे प्रयत्न सुरूच आहेत. अशा वेळी राष्ट्रपती सुखोई फायटर प्लेनमधून उड्डाण करणे म्हणजे भारताकडून शत्रू देशांना कडक संदेश देणे होय. तेजपूर एअरफोर्स बेस देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा एअरबेस आहे.
गज उत्सव-2023 चे उद्घाटन
तत्पूर्वी, राष्ट्रपती मुर्मू यांनी काल काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात गजा उत्सव-2023 चे उद्घाटन केले आणि नंतर गुवाहाटी येथे माउंट कांचनजंगा मोहीम-2023 ला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर गुवाहाटी येथे गुवाहाटी उच्च न्यायालयाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रपती मुर्मू यांनी हजेरी लावली.