‘मोदी आडनाव मानहानी’ प्रकरण : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, लोकसभा सचिवालयाची मोठी कारवाई
Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

ऋषभ | प्रतिनिधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत. सुरत न्यायालयाने त्यांना काल (23 मार्च) दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 10 जुलै 2013 च्या निकालानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व संपले आहे. 2019 मध्ये दाखल झालेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात सूरतमधील न्यायालयाने गुरुवारी राहुल गांधींना दोषी ठरवले आणि ‘मोदी आडनावा’शी संबंधित विधानासाठी त्यांना 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायालयाने गांधी यांना आयपीसीच्या कलम ५०४ अंतर्गत दोषी ठरवले, जे शांततेचा भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमानाशी संबंधित आहे. निकाल सुनावण्यात आला तेव्हा राहुल गांधी न्यायालयात हजर होते.

राहुल आता पुढील 8 वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीत.
मोदी आडनाव बदनामी प्रकरणात राहुल गांधींनी केवळ सदस्यत्व गमावले नाही , तर उच्च न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळाला नाही तर ते पुढील 8 वर्षे निवडणुकीच्या राजकारणातून बाहेर होतील. वास्तविक, कायदा म्हणतो की आमदार किंवा खासदाराला 2 वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सदस्यत्व रद्द केले जाईल. यानंतर शिक्षा संपल्यानंतरही तो ६ वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र समजला जाईल. न्यायालयाच्या निर्णयानंतर लगेचच हा नियम लागू होतो. हा नियम लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 8 (3) अंतर्गत लागू होतो.

‘मोदी आडनावा‘वर राहुल काय म्हणाले?
वायनाड मतदारसंघातून लोकसभा सदस्य असलेल्या गांधी यांनी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत ‘सर्व चोरांचे आडनाव मोदीच का आहे? अशी कथित टिप्पणी केली होती . राहुल गांधींच्या या वक्तव्याविरोधात भाजप आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी तक्रार दाखल केली होती.