मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जिंकला विश्वास दर्शक ठराव

Goan Varta Live | प्रतिनिधी

जयपूर :राजस्थान विधानसभेत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारने अखेर बहुमत सिद्ध करून दाखवले आहे. सरकारकडून संसदीय कार्यमंत्री शांती धारीवाल यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला.

केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरच मध्य प्रदेश आणि गोव्यातील सरकारे पाडण्यात आले, असे हा प्रस्ताव सादर करताना शांती धारीवाल म्हणाले. धन, बल आणि सत्तेच्या बळाने सरकार पाडण्याचे हे षडयंत्र राजस्थानात मात्र यशस्वी होऊ शकले नाही, असेही धारीवाल म्हणाले.

गेल्या अनेक दिवसांपासून राजस्थानात सुरू असलेल्या सत्तासंघर्ष नाट्यावर पडदा पडलेला आहे. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि समर्थकांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याविरोधात बंड पुकारले होतं. त्यानंतर राजस्थानात काँग्रेस सरकारवर टांगती तलवार होती. सचिन पायलट यांची काँग्रेसने उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केली होती.

सचिन पायलट पुन्हा पक्षात परतल्याने गेहलोत सरकारवरील अस्थिरतेचे संकट टळले होते. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सचिन पायलट यांनी आपण चांगल्या बहुमताने विश्वासदर्शक ठराव जिंकलो असल्याची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. विरोधकांनी अनेक प्रयत्न करुनही आमच्या सरकारच्या बाजूने निर्णय लागला असल्याचेही ते म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, निवडून आलेल्या सरकारांना पाडण्याचे प्रयत्न केले जात आहे. जेव्हा भैरोसिंह सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले गेले तेव्हा मी राज्यपाल आणि पंतप्रधानांकडे गेलो. तुम्हांपैकी अनेक लोक सरकार पाडण्याच्या विरोधात होते. त्यांना सरकार पाडावे असे वाटत नव्हते, कारण ही परंपरा नाही. या वेळी गेहलोत यांनी विरोधी पक्षनेता गुलाब कटारिया यांच्यावरही निशाणा साधला. गेहलोत म्हणाले की, पंतप्रधान म्हणतात की राजस्थानकडून इतर राज्यांनी प्रेरणा घ्यायला हवी. देशात राजकीय पक्षांमध्ये अनेकदा मतभेद होतात. आपल्या पक्षात वसुंधरा राजे यांच्या शासनात देखील असे झाले.

मी कधीही कुठल्याही पदाबाबत बोललो नाही. मी कुठल्याही पदाची मागणी केली नव्हती. मात्र आत्मसन्मानासाठी ही लढाई सुरू होती. माझ्या मनात कुठल्याही व्यक्तीबाबत द्वेषभावना नाही. आता पक्ष मला जी जबाबदारी देईल, ती मी सांभाळेन, असे सांगत सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण थंड केले होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!