मणिपूरमध्ये पुनः उफाळला हिंसाचार ; हल्लेखोरांनी ओलांडला बफरझोन, मैतेई समुदायाच्या 3 लोकांची हत्या

Goan Varta Live | प्रतिनिधी
वेबडेस्क 5 ऑगस्ट : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराची आग भडकली आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री मेईतेई समुदायाच्या तीन लोकांची हत्या करण्यात आली. याशिवाय बदमाशांनी अनेक घरांनाही आग लावली.
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराची घटना समोर आली आहे. बिष्णुपूरमध्ये हल्लेखोरांनी मैतेई समाजाच्या तीन लोकांची हत्या केली. काही लोकांनी बफर झोन ओलांडून मैतेई समाजातील लोक राहत असलेल्या भागात प्रवेश केला आणि गोळीबार केला, ज्यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला. केंद्रीय सैन्याने बिष्णुपूर जिल्ह्यातील क्वाकटा भागाच्या दोन किमी पलीकडे बफर झोन तयार केला आहे. यामुळे आता पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणावर आलेल्या जमावाने बिष्णुपूर जिल्ह्यातील दुसऱ्या आयआरबी युनिटच्या पोस्टवर हल्ला केला आणि दारुगोळ्यासह अनेक शस्त्रे लुटली. मणिपूर पोलिसांनी सांगितले की, जमावाने मणिपूर रायफल्सच्या 2 रा आणि 7TU बटालियनमधून शस्त्रे आणि दारुगोळा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सशस्त्र दल आणि हल्लेखोरांमध्ये गोळीबारही झाला, ज्यामध्ये अनेक सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. सुरक्षा दलांनीही हल्लेखोरांना चोख प्रत्युत्तर दिले.
याआधी गुरुवारी संध्याकाळी बिष्णुपूरमध्ये अनेक ठिकाणी गोळीबार झाल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. बेशिस्त जमावाची सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झटापटही झाली. सुरक्षा दलांनी सात बेकायदेशीर बंकर नष्ट केल्याची माहिती मणिपूर पोलिसांनी दिली.

गुरुवारी संध्याकाळी सुरक्षा दल आणि हल्लेखोरांमध्ये हिंसक चकमक झाली. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलाला हवाई गोळीबारासह अश्रुधुराचे नळकांडया फोडाव्या लागल्या. यासोबतच मणिपूरमधील इंफाळ आणि पश्चिम इंफाळ जिल्ह्यांतील कर्फ्यूमध्ये दिलेली शिथिलता मागे घेण्यात आली आहे.
मणिपूरमध्ये ३ मे रोजी पहिल्यांदा जातीय हिंसाचाराला सुरुवात झाली. मैतेई समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) समावेश करण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी डोंगरी जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मार्च’ काढण्यात आला. त्यानंतर मणिपूरमध्ये पहिल्यांदाच जातीय संघर्ष झाला. या हिंसाचारात आतापर्यंत 160 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. मणिपूरच्या लोकसंख्येच्या 53 टक्के लोकसंख्या मैतेई समाजाची आहे आणि ते बहुतेक इम्फाळ खोऱ्यात राहतात. कुकी आणि नागा समाजाची लोकसंख्या ४० टक्क्यांहून अधिक आहे. हे लोक डोंगराळ भागात राहतात.
