बिहारमध्ये ‘नितीशराज’ की..?

Goan Varta Live | प्रतिनिधी
लखनौ : बिहारमध्ये मतमोजणी सुरु असून भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (NDA) सत्तेच्या दिशेने घोडदौड सुरु आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल अशी शक्यता आहे. मात्र एनडीएने सत्ता मिळवल्यानंतर मुख्यमंत्रीपदावरुन पेच निर्माण होण्याचीही शक्यता वर्तवली जातेय. भाजप-जेडीयू आघाडीने सत्ता मिळवली, तर नितीश कुमार यांचं मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न भाजपवर अवलंबून असेल.
भाजप प्रथमच मोठ्या भावाच्या भूमिकेत
निवडणूक प्रचारात नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत, असं भाजपचे नेते म्हणत होते. पण बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर भाजप मुख्यमंत्रीपद सोडेल का, हा कळीच मुद्दा आहे. या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जेडीयूला फारशी चमकादार कामगिरी करता आलेली नाही. प्रथमच राज्यात भाजपा मोठया भावाच्या भूमिकेत जाऊ शकतो, त्यामुळे नितीश कुमार यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न भाजपवर अवलंबून असेल.
आम्ही शब्द पाळू : विजयवर्गीय
‘या निवडणुकीत मोदी यांच्या प्रतिमेने आम्हाला तारले’ असे भाजपाचे वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय म्हणाले. ‘सरकार स्थापना आणि नेतृत्वासंदर्भात संध्याकाळपर्यंत आम्ही निर्णय घेऊ’ असे विजयवर्गीय यांनी सांगितले. ‘जो कल आहे तसेच निकाल लागले, तर नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील. आम्ही आमचा शब्द पाळू’ असे विजयवर्गीय यांनी स्पष्ट केले. निवडणुकीतील जेडीयूच्या खराब कामगिरीसाठी नितीश कुमार यांच्या टीमने करोना व्हायरस आणि चिराग पासवान यांच्यावर खापर फोडले आहे.