अध्यक्षपद सोडण्यास तयार : सोनिया गांधी

पक्षांतर्गत निवडणुका घ्या : काँग्रेसच्या २३ नेत्यांची मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसमधील २३ वरिष्ठ नेत्यांनी पूर्णवेळ अध्यक्ष आणि पक्षांमध्ये फेरबदल करण्यासंदर्भात पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना सविस्तर पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये नेत्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदी कार्यक्षम व जनतेमध्ये सक्रिय असलेल्या नेत्याची निवड करण्यात यावी, अशी मागणी केली असून सोनिया गांधी यांनीही या पत्राला उत्तर दिले आहे. पक्षाध्यक्ष पद सोडायला आपण तयार असून, एकत्र येऊन नवीन अध्यक्षांची निवड करा, असे सोनिया गांधी यांनी नेत्यांना म्हटले आहे. त्यामुळे सोमवारी होणार्‍या काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, काँग्रेस पक्ष आपला जनाधार आणि युवकांचा विश्वास गमावत चालला आहे. पूर्णवेळ आणि प्रभावी नेतृत्वाची गरज आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर एका वर्षांनंतरही पक्षाने आत्मपरीक्षण केलेले नाही. नेहरू-गांधी कुटुंब नेहमीच पक्षाचे महत्त्वाचे घटक राहिलेले आहेत, असेही नव्या नेतृत्वाची मागणी करताना नेत्यांनी पत्रात म्हटले आहे.
पत्रात या नेत्यांच्या सह्या
या पत्रात राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, शशी थरूर, खासदार विवेक तनखा, मुकुल वासनिक, भूपिंदरसिंह हुड्डा, एम. वीरप्पा मोइली, पृथ्वीराज चव्हाण यांच्या सह्या आहेत.
 

काँग्रेस नेत्यांनी केलेल्या मागण्या

नेतृत्वात स्थायी आणि प्रभावी बदल व्हावेत

कार्यकारी समितीच्या निवडणुका घेतल्या जाव्यात

पक्षाची हरवलेली शक्ती पुन्हा प्राप्त करण्यासाठी धोरण आखण्यात यावे

संघटनेच्या प्रत्येक स्तरावर निवडणुका व्हाव्यात

संसदीय पक्ष मंडळाची निर्मिती व्हावी

प्रदेश काँग्रेस समित्यांना अधिकार द्यावेत

 

मांडलेल्या समस्या
राज्य काँग्रेसचे अध्यक्ष, पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्यांंमध्ये विनाकारण विलंब होत आहे.
सन्मान आणि जनाधार असलेल्या नेत्यांना राज्यांमध्ये पाठवले जात नाही.
राज्य प्रमुखांना संघटनेत निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत.
पुन्हा राहुल गांधींकडे नेतृत्व ?
सोमवारी होणार्‍या काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांना काँग्रेसचा हंगामी अध्यक्ष नियुक्त केली जाण्याची शक्यता आहे. काही आठवड्यांपासून अनेक नेते उघडपणे याची मागणी करत आहेत. पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी पुन्हा पक्षाचे नेतृत्व करावे, अशी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
काँग्रेस कार्यकारी समितीने १० ऑगस्ट रोजी पक्षाची सूत्रे स्वीकारण्याची विनंती केली होती. तेव्हा पुन्हा पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारण्यात रस नसल्याचे आपण सांगितले होते. जबाबदारी स्वीकारताना लवकरात लवकर पक्षाध्यक्ष पदाची निवड करावी, अशी अटही घातली होती. पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी सोडायला तयार असून, एकत्र येऊन नव्या अध्यक्षांची निवड करावी.
– सोनिया गांधी, हंगामी अध्यक्ष, काँग्रेस
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!