‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर जो बायडेन करणार का ?

याच बॉम्बनं डोनाल्ड ट्रम्प यांनी आयएस खुरासनचं मोडलं होतं कंबरडं !

Goan Varta Live | प्रतिनिधी

अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता पुन्हा प्रस्थापित झाल्यानंतर दिवसेंदिवस तेथील परिस्थिती अधिकाधिक भीषण बनत आहे. काबूल एअरपोर्टवर आयएसच्या अतिरेक्यांनी आत्मघाती हल्ला करुन 13 अमेरिकन जवानांसह 150 लोकांचा जीव घेतल्यानंतर अफगाणिस्तानातील स्थिती आणखी बिकट होत जाणार हे निश्चित. काबूल एअरपोर्टवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने त्यांच्या झिरो टॉलरन्स पॉलिसीनुसार तातडीने त्या घटनेच्या आयएस मास्टरमाईंडवर ड्रोन अ‍ॅटॅक करुन त्याला संपवून टाकले होते. पुन्हा एका वाहनावर रॉकेट हल्ला करुन काबूल एअरपोर्टवर आणखी एका हल्ला करण्याचे नियोजन करणार्‍या अतिरेक्याला त्याच्या वाहनासकट बेचिराख करण्यात आला. या निमित्ताने अमेरिका पूर्व अफगाणिस्तानातील खुरासन विभागातील आयएसच्या ठिकाणांवर पुन्हा एकदा मदर ऑफ ऑल बॉम्बचा वापर करण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे.

अणुबॉम्बनंतर सर्वाधिक ताकदीचा समजल्या जाणार्‍या या बॉम्बचा वापर अमेरिकेने यापुर्वी 14 एप्रिल 2017 रोजी अफगाणिस्तानातच आणि आयएस विरोधातच नांगरहार विभागात केला होता. त्यावेळी सर्वप्रथम जगातील सर्वात ताकदीचा नॉन न्युक्लीयर मदर ऑफ ऑल बॉम्ब चर्चेत आला. तब्बल 9 हजार 800 किलो वजनाची स्फोटके समाविष्ट असणार्‍या या बॉम्बचे शास्त्रीय नाव जीबीयू 43 बी मॅसीव्ह ऑर्डिनन्स एअर ब्लास्ट बॉम्ब असे आहे. नांगरहारवरील त्या हल्ल्यात आयएसचे शेकडो अतिरेकी क्षणात बेचिराख होऊन गेले होते. काही सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाल्यामुळे अफगाणिस्तानसह अनेक देशांनी मदर ऑफ ऑल बॉम्बच्या वापराला विरोध केला होता.

एमओएबी ची पहिली टेस्ट अमेरिकेने 2003 साली केली होती. परंतु त्याचा अमेरिकन एअरफोर्समध्ये समावेश करुनही प्रत्यक्ष युध्दभुमीत वापर करण्यासाठी मात्र 2017 उजाडले. याची लांबी तब्बल 9 मीटर म्हणजेच 30 फूट असल्यामुळे तो जमिनीवर ड्रॉप करण्यासाठी एमसी 130 सारख्या अजस्त्र लढाऊ विमानाचा वापर करावा लागतो. हा बॉम्ब जीपीएस गायडेड असला तरी त्याच्या प्रचंड आकारामुळे जमिनीच्या दिशेने सोडताना पॅराशुटचा वापर केला जातो. 2017 च्या हल्ल्यात अमेरिकन एअरफोर्सने आयएस अतिरेकी राहत असणार्‍या डोंगररांगांमधील नैसर्गिक गुहांना टार्गेट केले होते. त्यावेळी 5 चौरस किलोमीटर क्षेत्रापर्यंत त्याचा इम्पॅक्ट दिसून आला होता. यावरुनच मानवी वस्तीत त्याचा वापर किती संहारक ठरु शकतो याचा अंदाज येईल.

चार वर्षांपुर्वी एमओएबी च्या तडाख्यात सापडल्यानंतर आयएस खुरासनचे कंबरडे मोडले होते. ज्यामधून सावरायला त्यांना अनेक महिन्यांचा कालावधी लागला. त्यामुळे आता किमान अफगाणिस्तानातून आपले सगळे सैनिक आणि नागरिक परतेपर्यंत आयएसला खामोश करण्यासाठी अमेरिका एमओएबी चा वापर करेल अशी चर्चा आहे. परंतु 2017 साली अमेरिकेत ट्रम्प यांचे कणखर सरकार होते. ट्रम्पनी जगाचा विरोध न जुमानता एमओएबीचा बिनधास्तपणे वापर केला होता. आंतरराष्ट्रीय धोरणात कमजोर म्हणून ओळखले जाऊ लागलेले जो बायडेन मदर ऑफ ऑल बॉम्बचा वापर करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखी कणखरता दाखवणार का, हाच प्रश्न आहे.

– दीपक पाटील

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!