US Election 2020 : जो बायडन होणार अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष

डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव

Goan Varta Live | प्रतिनिधी

वॉशिंग्टन : गेले काही दिवस रखडलेला अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. अमेरिकन आणि युरोपीय माध्यमांनी जो बायडन (Joe Biden) जिंकल्याचं जाहीर केलं आहे. ट्रम्प (Donald Trump) यांना 214 पर्यंतच मजल मारता आली, तर बायडन यांनी 284 पर्यंत आकडा गाठला आहे. व्हिस्कॉन्सिन, पेनसिल्वेनिया, मिशिगन अशा स्विंगिंट स्टेट्समध्ये ट्रम्प यांना पराभव पत्करावा लागला आणि याच राज्यांमुळे बायडन यांचा विजय निश्चित केला.

पहिल्या भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष

जो बायडेन यांच्याबरोबर उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेल्या कमला हॅरिस यांनी अनेक बाबतीत इतिहास घडवला आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्या कृष्णवर्णीय, महिला आणि त्यातही भारतीय वंशाच्या महिलेला हा सन्मान मिळाला आहे.

29 व्या वर्षी बायडन पहिल्यांदा सीनेटर

1972 मध्ये वयाच्या 29 व्या वर्षी बायडन पहिल्यांदा सीनेटर झाले होते. त्या आधी झालेल्या एका भीषण अपघातात त्यांची पत्नी आणि लहान मुलीचा मृत्यू झाला होता. बियू आणि हंटर ही त्यांची मुलंही त्या अपघातामध्ये गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर बायडन कोलमडून गेले होते. त्यावेळी त्यांच्या मनात आत्महत्येचेही विचार घोळत होते. आता जगण्यात अर्थच राहिलेला नाही त्यामुळे जगून तरी काय फायदा असं त्यांना वाटत असे. मात्र या नैराश्यावर मात करत ते पुन्हा उभे राहिले.

नंतर बराक ओबामा यांचे ते जवळचे सहकारी झाले. ओबामा अध्यक्ष असताना बायडन हे उपाध्यक्ष होते. 2015मध्ये त्यांचा मुलगा बियू याचा ब्रेन कॅन्सरने मृत्यू झाला होता. तर दुसरा मुलगा हंटर याला कोकेन बाळगल्या प्रकरणी नौदलातून काढून टाकण्यात आलं होतं. 1988मध्ये ते अर्धांग वायूच्या आजारातूनही बाहेर आले. अशा अनेक संकटावर मात करत आता बायडेन यांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे.

77 वर्षांच्या बायडन यांच्यावर गेल्या काही वर्षांमध्ये प्रकाशझोत असला तरी त्यांनी आयुष्याच्या सुरूवातीला अतिशय कष्टात दिवस काढले आहेत. बायडन यांचे मित्र जिम कॅनडी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की जो यांनी जे कष्ट भोगले ते कुणाच्याही वाट्याला येऊ नयेत. त्यामुळे ते एवढे खंबीर बनले की एकदा ठरवल्यावर ते ती गोष्ट केल्याशीवाय राहात नाहीत.

कोळशांच्या खाणी आणि मोठ मोठाली यंत्र यांच्या सहवासात त्यांचं बालपण कष्टात गेलं होतं. लहान असताना बोलण्यात ते अडखळत असत. त्यामुळे शिक्षकांनी त्यांचा अपमानही केला होता. नंतर त्यांनी भाषेवर प्रभुत्व मिळवलं. ‘प्रॉमिस टू कीप’ हे त्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देणारं लिहिलेलं पुस्तक प्रसिद्ध आहे.

पहा व्हिडीओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!