‘या’ देशानं लॉकडाऊनशिवाय मिळवलं कोरोनावर नियंत्रण !

रेस्टॉरंट, बार, कॉलेज, पब्लिक गार्डन्स सुरू ; मास्कचीही सक्ती नाही

Goan Varta Live | प्रतिनिधी

ध्या संपूर्ण भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धुमाकूळ सुरु आहे. व्हॅक्सीनच्या कमतरतेमुळे आणि अजूनही टेस्टींग, ट्रेसींगबाबत प्रचंड उदासीनता असल्याने दररोज वाढणाऱ्या हजारो केसेस आणि शेकडो मृत्यू टाळण्यासाठी देशातील सर्व राज्य सरकारांनी आवडता लॉकडाऊनचा पर्याय निवडलेला दिसतो. वास्तविक लॉकडाऊन हा कोरोना संसर्ग थांबवण्याचा नव्हे तर लांबवण्याचा पर्याय असल्याचे जगभरातील तज्ञांनी वेळोवेळी सांगितले आहे. गेल्या वर्षी पुढाकार घेऊन देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केलेल्या मोदी सरकारच्याही हे लक्षात आल्यामुळे त्यांनी आता हा अगदी शेवटचा पर्याय वापरण्याचे आवाहन केले होते. परंतु देशातील बहुतेक राज्य सरकारांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आपली आरोग्य यंत्रणा अजिबात सक्षम केली नाही.

प्रगत राष्ट्रांनी ज्या ज्या वेळी लॉकडाऊन केला तो आपली आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी आणि लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी. लॉकडाऊन केल्यानंतरही तेथील सरकारे सक्षमपणे नागरिकांच्या दैनंदिन गरजांची घरपोच पुर्तता करण्याबरोबरच भरीव आर्थिक मदतही देत असतात. भारतात लॉकडाऊन जाहीर करुन केवळ शिवभोजन थाळी, रेशन धान्य यासारख्या तकलादू उपाययोजना करुन बहुतेक जनतेला वाऱ्यावर सोडण्यात येते. आपल्याकडे अजूनही कोरोनाची कथीत साखळी तोडण्यासाठी म्हणूनच लॉकडाऊन जाहीर केला जातो. ही साखळी नेमकी कशी तुटणार हे ना सरकारला माहित असते ना त्यांना सल्ला देणाऱ्या कथीत तज्ञांना.

लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या अशा साखळ्या कधीच तुटत नाहीत. उलट सतत लॉकडाऊनची मुदत वाढवत राहिल्यामुळे देशाच्या अर्थकारणाच्या साखळ्या मात्र खिळखिळ्या होऊन जातात. जगातील बहुतेक देशांनी गेल्या वर्षी लॉकडाऊन जाहीर केले होते. पण असा एक देश आहे, ज्याने कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून आजतागायत कधीही आणि कोणत्याही स्वरुपाचा लॉकडाऊन केला नाही. तो आहे युरोपमधील स्वीडन. स्वीडनने पहिल्यापासून अँटी लॉकडाऊन पॉलिसी अवलंबली आहे. तिथे लोक सामान्यपणे रेस्टॉरंटमध्येही जाऊ शकतात. कॉलेजेस, पब्लिक गार्डन्स, बार्सही नेहमीप्रमाणे सुरु आहेत. स्वीडिश सरकारच्या मते अनिश्चित काळासाठी लॉकडाऊन सुरु ठेवल्यामुळे जे आर्थिक आणि सामाजिक संकट ओढावेल ते कोरोनापेक्षाही भयंकर ठरु शकते. त्यामुळे अर्थव्यवस्था सुरळीतपणे चालू ठेवत कोरोनाशी लढणे प्रत्येक नागरिकाने शिकणे आवश्यक आहे.

मास्कची सक्ती न करण्याबाबत तेथील प्रशासनाकडून असे सांगण्यात येत आहे की, कोरोना व्हायरस अनेक वर्षे आपल्यासोबत राहणार आहे. त्यामुळे हळूहळू त्याच्याविरुद्ध लढण्याची प्रतिकार क्षमता म्हणजेच इम्युनिटी पॉवर आपल्या शरीरात निर्माण व्हायची असेल तर त्याच्या सानिध्यात वावरण्याचीही तयारी ठेवली पाहिजे. अर्थात कोरोनासाठी अधिक व्हल्नरेबल असणाऱ्या लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मात्र स्टे होम, मास्क, सोशल डिस्टंसिंगचे आवाहन केले जात असते. स्वीडिश सरकारची ही पॉलिसी अतिशय खतरनाक ठरु शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक देशांनी दिला होता. मात्र स्वीडिश सरकार अँटी लॉकडाऊन पॉलिसीवर ठाम राहिले. आज 300 टक्के टेस्टिंग केल्यानंतर 1 कोटी 20 लाख लोकसंख्येच्या स्वीडनमध्ये एकूण 10 लाख 60 हजार कोरोनाबाधीत आढळले. मृतांची संख्या फक्त 14 हजार 366 इतकी आहे. आता देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरु झाल्यानंतर दैनंदिन बाधितांची संख्या 500 च्या ही आत आली आहे. लॉकडाऊनसारखे अघोरी उपाय न करताही कोरोनाला नियंत्रित कसे करता येते, हे स्वीडनने जगाला दाखवून दिले आहे.

  • दीपक पाटील जर्नलिस्ट-सोशल मीडिया एक्स्पर्ट
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!