इंडोनेशियात विष्णूची सर्वात मोठी मूर्ती

122 फूट उंच आणि 64 फूट रुंदीची मूर्ती

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर या त्रयीपैकी विष्णू ही देवता सृष्टीची पालनकर्ती मानली जाते. विष्णूची मंदिरे केवळ भारतातच नव्हे, तर प्राचीन बृहदभारताचा भाग असलेल्या अनेक देशांमध्येही आढळतात. त्यामध्येच कंबोडियातील ‘जगातील सर्वात मोठे मंदिर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंकोर वटचाही समावेश होतो. आता इंडोनेशियामध्ये जगातील सर्वात मोठी विष्णू मूर्ती निर्माण करण्यात आलेली आहे. ती 122 फूट उंच आणि 64 फूट रुंदीची आहे. तिच्या निर्मितीसाठी तांबे आणि पितळ या धातूंचा वापर केला आहे. गरुडावर बसलेल्या आणि हातात सुदर्शन चक्र धारण केलेल्या विष्णूची ही भव्य प्रतिमा आहे.

28 वर्षांमध्ये मूर्तीचं काम पूर्ण

1979 मध्ये इंडोनेशियाचे रहिवासी असलेल्या बप्पा न्यूमन नुआर्ता यांनी अशी विशालकाय विष्णू मूर्ती निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्यासाठी एक कंपनी स्थापन करण्यात आली आणि हे अत्यंत कठीण काम 28 वर्षांमध्ये पूर्ण करण्यात आलं. न्यूमन नुआर्ता यांनी 1994 मध्ये प्रत्यक्ष मूर्ती घडवण्याचं काम सुरू केलं. इंडोनेशियन सरकारनेही या प्रकल्पाला मदत केली. 2018 मध्ये या मूर्तीचे काम पूर्ण झालं.

अनेकदा काम थांबलं

दरम्यानच्या काळात बजेट कमी पडलं म्हणून अनेक वेळा या मूर्तीचे काम थांबवावं लागलं. एकदा या परिसरातील लोकांनी आक्षेप घेतल्यानं काम थांबलं. मात्र, ही मूर्ती तयार झाल्यावर ती इंडोनेशियातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ ठरेल हे पटल्यावर लोकांचा विरोध मावळला आणि काम पुन्हा सुरू झाले. मूर्तीचं काम पूर्ण झाल्यावर सर्वप्रथम इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विदोदो यांनी तिचे दर्शन घेतलं आणि त्यानंतर ती सर्वांसाठी खुली करण्यात आली.

मुरुगनचं स्थान

मलेशियात बाटू गुहेत भगवान कार्तिकेय म्हणजेच मुरुगनचं स्थान आहे. या गुहेकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या सुरुवातीस मुरुगनचीही भव्य मूर्ती आहे. ही सोनेरी मूर्ती 42.7 मीटर म्हणजेच 140 फूट उंचीची आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!