प्रवाशांना घेऊन जाणारं विमान समुद्रात कोसळलं

विजेच्या वेगानं श्रीविजया एअर या कंपनीचं विमान समुद्रात कोसळलं आणि मोठ्ठा आवाज झाला.

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

जकार्ताः इंडोनेशियातील श्रीविजया एअर या कंपनीच्या विमानाने शनिवारी जकार्ताहून उड्डाण केल्यानंतर अवघ्या चार मिनिटांतच ते समुद्रात कोसळलं. या विमानातील प्रवासी, कर्मचार्यांसह अनेकजण मृत्यू पावल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.

नेमकं काय घडलं?

इंडोनेशियातील श्रीविजया एअर या कंपनीच्या विमानाने शनिवारी इंडोनेशियाची राजधानी जकार्ताहून उड्डाण केलं. स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजून 36 मिनिटांनी उड्डाण घेतलं. श्रीविजया एयर बोइंग 737चा जकार्ताच्या कलिमनतन प्रांतातल्या रस्त्यात संपर्क तुटला. काही मिनिटांनंतर म्हणजे 2 वाजून 40 मिनिटांनी या विमानाशी शेवटचा संपर्क झाला होता. SJY182 असा कॉल साईन होता, अशी माहिती परिवहन मंत्रालयानं दिलीये. त्यानंतर विमान बेपत्ता झालं होतं. या विमानात 62 प्रवासी होते. परिवहन मंत्रालयाच्या माहितीनुसार, विमान बेपत्ता झाल्यानंतर विमानाचा शोध घेण्यासाठी बचावपथकांना सक्रिय करण्यात आलं. शोधकार्य रात्र अंधारल्यामुळे थांबवण्यात आलं. मात्र, पहाटेपासून पुन्हा शोधकार्यास सुरुवात करण्यात आली. या विमानातून कुठल्याही संकाटाचा सिग्नल पाठवण्यात आला नव्हता, अशी माहिती इंडोनेशियाच्या राष्ट्रीय शोधकार्य आणि बचावकार्य यंत्रणेचे प्रमुख एअर मार्शल बगस पुरुहितो यांनी दिलीये.

विमान कोसळल्याचा आवाज

बेपत्ता झालेल्या श्रीविजया एअर या कंपनीच्या विमानाला शोधण्याचं कार्य सुरू असताना एका प्रत्यक्षदर्शीनं एका मोठा आवाज ऐकल्याचं सांगितलं. सोलिहिन नावाच्या एका मच्छीमारानं बीबीसीच्या इंडोनेशियन सर्व्हिसशी बोलताना म्हटलंय, त्यांनी हा अपघात होताना पाहिला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कॅप्टनसोबत बेटावर परतण्याचा निर्णय घेतला. त्यांनी म्हटलं, “विमान विजेच्या वेगानं समुद्रात कोसळलं आणि मोठा आवाज झाला. आम्ही जवळच होतो. काही तुकडे आमच्या जहाजावरही येऊन आदळले.”

विमान10 हजार फूट खाली आलं

विजेच्या वेगानं श्रीविजया एअर या कंपनीचं विमान समुद्रात कोसळलं आणि मोठ्ठा आवाज झाला,’ असं तेथील एका मच्छीमारानं सांगितलं. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइटरडार 24 डॉट कॉमनुसार, हे विमान एका मिनिटापेक्षा कमी वेळात 10 हजार फूट खाली आलं. त्यामुळे ते थेट समुद्रात येऊन पडलं.

नौदलातील बोटी रवाना

श्रीविजया एअर या कंपनीच्या विमानाचा शोध लागताच नौदलातील चालक असलेल्या 10 हून अधिक बोटी विमान कोसळल्याच्या ठिकाणाकडे रवाना झाल्या. या अपघातात विमानातील ६२ प्रवाशांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जातेय.

’26 वर्षं जुनं होतं विमान’

बीबीसीचे प्रतिनिधी थियो लेगेट यांच्या मते इंडोनेशियातील अनेक विमानं खूप जुनी झाली आहेत. शनिवारी बेपत्ता झालेलं विमान 26 वर्षं जुनं होतं. सुरक्षित विमान उड्डाणांबाबत इंडोनेशियाचा इतिहास फारसा चांगला नाहीये. ऐंशी आणि नव्वदच्या दशकात बनलेली अनेक विमानं इंडोनेशियात अजूनही वापरली जातात. इंडोनेशियामध्ये याआधीही दोन मोठे विमान अपघात झालेत, ज्यामध्ये 737 मॅक्स बोइंग विमानं दुर्घटनाग्रस्त झालेली. शनिवारी (9 जानेवारी) जकार्ताहून टेक ऑफ केलेलं विमान 737 मॅक्स श्रेणीतलं नाहीये.

विमान अपघातांच्या यादीत इंडोनेशिया आघाडीवर

प्रवासी विमान वाहतूकीच्या अपघाताची इंडोनेशियातील ही पहिलीच घटना नसून २०१८ साली लायन एअर या इंडोनेशियन विमान वाहतूक कंपनीच्या बोईंग ७३७ मॅक्स या विमानाचाही अपघात होऊन १८९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. २०१४ सालीही एअर एशियाच्या प्रवासी विमानाचा अपघात होऊन १६२ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. विमान अपघातांच्या यादीत इंडोनेशिया जगात आघाडीवर असून विमानवाहतूकीसाठीच्या अतिशय हलक्या दर्जाच्या पायाभूत सुविधा, जुन्या आणि सुरक्षा मानकांमध्ये न बसणाऱ्या विमानांना कार्यरत ठेवलं जाणं, ही इंडोनेशियातील सातत्यानं होणाऱ्या विमान अपघातांची मुख्य कारणं आहेत. या घटनेमुळं इंडोनेशियातील विमानवाहतूक सेवेचा दर्जा आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.