व्हिएन्ना हादरलं! दहशतवादी हल्ल्यात चार जणांचा मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी
व्हिएन्ना : ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये दहशतवादी हल्ला झालाय. अज्ञातांच्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झालाय. शिवाय अनेकजण जखमी झालेत. हा दहशतवादी हल्ला असल्याचे ऑस्ट्रियाच्या गृहमंत्रालयाने स्पष्ट केलय. हल्ला झाल्यानंतर सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत एका संशयित हल्लेखोराचा मृत्यू झालाय.
गर्दीचं ठिकाण लक्ष्य…
हल्लेखोरांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात अनेकजण जखमी झाले असून यामध्ये एका पोलिसाचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत पोलिसांनी एका संशयित हल्लेखोराला ठार केले आहे. करोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रियात लॉकडाउन सुरू होणार होता. त्यामुळे व्हिएन्नात मोठी गर्दी होती. स्थानिक वेळेनुसार सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला.
दहशतवादासमोर झुकणार नाही!
ऑस्ट्रियाचे चान्सलर सेबेस्टियन कुर्ज यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा या दहशतवादी हल्ल्याचा कट आखणाऱ्यांना नक्कीच शोधून काढतील, असेही त्यांनी सांगितले. दहशतवादासमोर आम्ही कधीच झुकणार नसल्याचेही त्यांनी म्हटले. पोलीस दलाकडून दहशवादविरोधी कारवाई सुरू झाली असून दुसरीकडे ऑस्ट्रियाच्या सैन्याला महत्त्वाच्या इमारतींची सुरक्षा सोपवली आहे. व्हिएन्नात लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आलंय. त्याशिवाय सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहण आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर न करण्याचेही आवाहन करण्यात आलंय.