क्रूरतेचा कळस! तालिबान्यांनी कुटुंबीयांसमोरच गर्भवती महिला पोलिसावर झाडल्या गोळ्या

अफगाणिस्तानच्या गोर प्रांतात घडली घटना

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: तालिबान या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर सर्व जगालाच धक्का बसला. दहशतवाद पुन्हा पोसला जाणार ही भीती सर्वत्र पसरली; पण सर्वांत जास्त भयव्याकूळ झाल्या त्या अफगाणिस्तानातल्या महिला. कारण तालिबानच्या लेखी महिलांना असलेलं तुच्छ स्थान आणि त्यांच्याकडून महिलांवर होत असलेले अत्याचार. तालिबानच्या या बदलौकिकाला साजेशा घटना तालिबानी राजवट आल्यानंतर तिथे दिसू लागल्या आहेत. नुकतीच तिथे अशी एक घटना घडली.

हेही वाचाः शेळ्या सांभाळणाऱ्या अनिसाची राज्याच्या टीममध्ये निवड

महिला पोलिसाला तिच्या कुटुंबीयांसमोरच गोळ्या घातल्या

अफगाणिस्तानच्या गोर प्रांतात तालिबानच्या दहशतवाद्यांनी एका महिला पोलिसाला तिच्या कुटुंबीयांसमोरच गोळ्या घालून ठार केलं. एका स्थानिक पत्रकाराने ट्विट करून या घटनेची माहिती दिली. निगारा असं त्या महिलेचं नाव असून, ती सहा महिन्यांची गर्भवती होती. तरीही तालिबान्यांनी तिचा पती आणि मुलांच्या समोरच तिची गोळ्या घालून हत्या केली. त्यामागचं कारण समजू शकलेलं नाही.

तालिबानच्या दृष्टीने महिला म्हणजे जिवंत माणसं

तालिबान्यांकडून अशा प्रकारची क्रूर कृत्यं घडणं नवीन नाही. खातेरा या नावाच्या तिथल्या 33 वर्षांच्या माजी महिला पोलीस अधिकारी सध्या दिल्लीत आहेत. ‘तालिबानच्या दृष्टीने महिला म्हणजे जिवंत माणसं नव्हेतच. महिला म्हणजे केवळ तोडण्यासारखे मांसाचे तुकडे आहेत, असं त्यांना वाटतं…,’ असं खातेरा म्हणाल्या होत्या. अफगाणिस्तानच्या गझनी प्रांतात गेल्या वर्षी तालिबान्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. त्यांच्यावरचा हल्ला इतका भयानक होता, की त्यांचे डोळे बाहेर आले होते. त्यानंतर नोव्हेंबर 2020पासून पती आणि लहान मुलासह त्यांचं दिल्लीत उपचारांसाठी वास्तव्य आहे. पूर्वी तालिबानी बंडखोर असलेल्या त्यांच्या वडिलांनीच त्यांच्यावरच्या हल्ल्याचा कट रचला होता, असं खातेरा यांनी सांगितलं.

हेही वाचाः 1 ऑक्टोबरपासून 12 तास करावं लागणार काम, ओव्हरटाइम-PF मध्ये होणार बदल

तालिबानची राजवट नसतानाच्या काळात अफगाणिस्तानने मानवाधिकार आणि महिलांच्या अधिकारांमध्ये जी काही प्रगती केली आहे, ती पुन्हा धुळीला मिळणार असल्याची भीती अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. नव्या पिढीने तालिबान्यांच्या क्रूरतेच्या ज्या कहाण्या केवळ पुस्तकात वाचल्या होत्या किंवा ऐकल्या होत्या, त्या दुर्दैवाने आता त्यांनाही अनुभवायला मिळणार आहेत, असं विशेषज्ञ सज्जन गोहेल यांनी सांगितलं.

अफगाणिस्तानच्या नव्या तालिबान सरकारमध्ये महिलांनाही प्रतिनिधित्व दिलं जावं, पुरुषांप्रमाणेच समान अधिकार महिलांना मिळावेत, अशा मागणीसाठी अलीकडेच हेरातमध्ये महिलांनी आंदोलन केलं होतं, असं वृत्त टोलो न्यूजने दिलं होतं.

हा व्हिडिओ पहाः DOG ATTACK | कुत्र्यांकडून 20 पेक्षा अधिक चावे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!