पाकिस्तानात सिंध पोलिसांचं बंड

इम्रान खान सरकार, लष्कराविरोधात रोष. गोळीबार आणि बॉम्बवर्षाव सुरूच. दोघांचा मृत्यू. सिंध पोलिस आणि लष्करात मोठी धुमश्चक्री.

Goan Varta Live | प्रतिनिधी

सिंध : आर्थिक आघाडीवर कफल्लक झालेल्या पाकिस्तानला अंतर्गत कुरघोड्यांनी पोखरलं आहे. सिंध प्रांतातील पोलीस अधिकाऱ्यांनी लष्कराविरोधात खुलेआम बंड पुकारले आहे. इम्रान खान सरकारविरोधात तिथले विरोधी पक्ष एकवटले असून आंदोलन सुरु आहे. दरम्यान, पाक लष्करानं सिंध प्रांतात नियंत्रण मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात केलं आहे. गोळीबार आणि बॉम्बवर्षाव सुरूच असून यात दोघांचा मृत्यू झाला. सध्या सिंध पोलिस आणि लष्करात मोठी धुमश्चक्री उडाली आहे.

सिंध प्रांताचे मुख्यमंत्री सय्यद मुराद अली शाह यांनी आपलं सरकार पोलिसांच्या पाठिशी खंबीरपणे उभं असल्याचं विधान केल्यानं आगीत तेल ओतलं गेलं आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे जावई आणि पीएमएल-एन पक्षाच्या नेत्या मरियम नवाझ यांचे पती सफदर अवान यांच्या अटकेनंतर आता पाकिस्तानमध्ये वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील पोलिसांनी लष्कराविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. सिंध प्रांतातील जवळपास ७० अधिकारी सामुहीक सुट्टीवर गेले आहेत.

विरोधी पक्षांचं सरकारविरोधात मोठे आंदोलन
अलीकडेच पाकिस्तान लोकशाही चळवळ या नावाखाली एकटवलेल्या पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी इम्रान खान सरकारविरोधात मोठे आंदोलन केले. कराचीमध्ये झालेल्या सभेला हजारो लोक जमले होते, यावेळी इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. पाकिस्तानाल इम्रान खान सरकारला इलेक्टेड नाही, तर सिलेक्टेड सरकार म्हणतात. पाकिस्तानी लष्कराने त्यांना सत्तेवर बसवल्याचा आरोप केला जातो.

आयजीपी मुश्ताक महार यांना अपमानित केल्यानं संताप
कराचीतील सभेनंतर पाकिस्तान मुस्लिम लीगच्या नेत्या मरियम नवाज यांचे पती सफदर अवान यांना हॉटेलमधल्या खोलीतून अटक करण्यात आली. पाकिस्तान मुस्लिम लीग हा नवाझ शरीफ यांचा पक्ष आहे. पीएमएल-एन चे नेते सफदर अवान यांच्या अटक नात्यामध्ये सिंधचे आयजीपी मुश्ताक महार यांना अपमानित करण्यात आले. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला अशा प्रकारे अपमानित करण्यात आल्याने, चिडलेल्या सिंध प्रातांच्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी एकाचवेळी सुट्टीसाठी अर्ज केला. द न्यूज इंटरनॅशनलने हे वृत्त दिले आहे.

लष्कर प्रमुख भडकले
रेंजर्सनी सिंधच्या आयजीपींचे अपहरण केले व सफदर विरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला, असा आरोप पीएलएल-एन पक्षाच्या प्रवक्त्याने केला आहे. या प्रकाराची सिंधच्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्यांनी एकत्रित रजेसाठी अर्ज केला. या संपूर्ण प्रकरणात पाकिस्तानी लष्कराचे नाव गोवल्याने लष्कर प्रमुख बाजवा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!