काबूल विमानतळावर चेंगराचेंगरी; सात जणांचा मृत्यू

देश सोडण्यासाठी हजारो नागरिक विमानतळ परिसरात

Goan Varta Live | प्रतिनिधी

काबूल: अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सत्तेनंतर आता नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. तालिबानच्या राजवटीत नरकयातना भोगव्या लागतील, या भीतीने अनेक नागरिक देश सोडून पलायन करत आहेत. अशातच देश सोडून जाणाऱ्या नागरिकांची विमानतळावर गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर लोकांची गर्दी झाल्याने तणावपूर्ण स्थिती आहे. अशातच गोंधळ झाला आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ७ अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती ब्रिटिश लष्कराने दिली आहे.

हेही वाचाः सिद्धी नाईकच्या मृत्यूप्रकरणी ‘लव्ह ट्रॅन्गल’चा पोलिसांकडून शोध

अफगाणिस्तानमधील स्थिती गंभीर

ब्रिटीश लष्कराने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, अफगाणिस्तानमधील स्थिती गंभीर आहे. परिस्थिती सुरक्षितरीत्या हातळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी जे काही आवश्यक आहे ते केलं जात आहे. तालिबानच्या राजवटीनंतर पळून जाण्यासाठी विमानतळ केंद्रबिंदू ठरत आहे. त्यामुळे विमानतळावरील स्थिती गंभीर होत चालली आहे.

वायूसेनेच्या विमानाने भारतीय दाखल

अफगाणिस्तानवरून ८७ भारतीयांना घेऊन वायू सेनेचं एक विशेष विमान रविवारी पहाटे दिल्लीत दाखल झालं. या नागरिकांना शनिवारी भारतीय वायू सेनेच्या विमानाद्वारे सर्वप्रथम काबूलवरून ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे येथे नेलं गेलं होतं. या पाठोपाठच भारतीय वायू सेनेच्या सी-१७ या विमानानेही काबूलहून १६८ नागरिकांना घेऊन परतलं आहे.

हेही वाचाः देशात दोन लाख आयसीयू बेड तयार ठेवा

दुसरीकडे, काबूल विमानतळावर सध्या अमेरिकन सैन्य दाखल आहे. त्यांच्याकडून भारताला रोज दोन विमान फेऱ्यांना परवानगी दिली गेली आहे. अमेरिकादेखील अफगाणिस्तानमधील आपल्या नागरिकांना काबूल विमानतळावरून परत आणत आहे. सध्या काबूल विमानतळावर जवळपास पाच हजाराच्या संख्येने अमेरिकन व नाटो सैन्य दाखल आहे.

हेही वाचाः छत्रपतींच्या परंपरेनुसार सिंधुदुर्ग किल्ल्यावर समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण

तालिबानचा आरोप

विमानतळावरील चेंगराचेंगरीच्या स्थितीला अमेरिका जबाबदार असल्याचा आरोप तालिबानने केला आहे. अमेरिका आणि तिची प्रशासकीय यंत्रणा विमानतळावर नियंत्रण राखण्यात अपयशी ठरली आहे. अपगाणिस्तानमध्ये सर्वत्र शांतता आहे. पण फक्त काबुल विमानतळावर गोंधळाची स्थिती आहे, असा आरोप तालिबानचा अधिकारी अमीर खान मुताकीने केला आहे.

हेही वाचाः कर्फ्यू पुन्हा वाढवला! 30 ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम

तालिबानींच्या हवेत गोळीबारामुळे दुर्घटना

तालिबानने विमानतळाजवळ काही आदेश जारी केल्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नागरिकांना रांगेत उभं राहण्यासाठी आणि विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून दूर राहण्यासाठी तालिबानींनी हवेत गोळीबार केला, तसंच नागरिकांना बंदुकीच्या बटने मारहाण केली. यामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. विमानतळाच्या गेटवर रांगेत उभा असलेला कुठलाही नागरिक गंभीर जखमी झालेला नाही, असेही प्रत्यक्षदर्शी म्हणाले.

अफागाणिस्तान सोडण्यासाठी काबूल विमानतळ परिसरात प्रचंड गर्दी आहे. विमानतळाच्या गेटवर हजारो नागरिकांनी गर्दी केली आहे. विमानतळात जाण्यासाठी सर्वांची धडपड सुरू आहे. दुसरीकडे तालिबानी अफगाण नागरिकांना देश सोडण्यासाठी रोखत आहेत. विमानतळाच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर तालिबानींकडून अतिशय कडक पहारा दिला जात आहे. तालिबानी ये-जा करणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करत आहेत.

हा व्हिडिओ पहाः Crime | Sucide | कांदोळी किनारी आढळलेल्या मृतदेहाबाबत खुलासा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!