पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती बायडेन यांच्यात दीड तास चर्चा

बैठकीत व्यापार, सुरक्षा, द्विपक्षीय संबंधांबाबतचं व्हिजन आदी महत्वपूर्ण विषयांवर चर्चा

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत जवळपास दीड तास चर्चा झाली. भारतीय वेळेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी साधारण रात्री 8 वाजून 35 मिनिटांनी व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले. व्हाईट हाऊसमध्ये पोहोचताच पंतप्रधान मोदीयांचं राष्ट्रपती जो बायडेन यांनी स्वागत केलं. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केलं. त्यानंतर व्हाईट हाऊसमधील ओवल कार्यालयात दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये चर्चेला सुरुवात झाली. ही बैठक जवळपास दीड तास चालली. बैठकीत व्यापार, सुरक्षा, द्विपक्षीय संबंधांबाबतचं व्हिजन आदी महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली.

बैठकीच्या सुरुवातीला अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी ट्वीट करुन या बैठकीची माहिती दिली. मी द्विपक्षीय बैठकीसाठी व्हाईट हाऊसमध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करत आहे. दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करणे, एक स्वतंत्र आणि खुले इंडो-पॅसिफिक कायम ठेवणे, कोरोनापासून जलवायू परिवर्तनपर्यंत सर्व बाबींसाठी तत्पर आहे.

अमेरिकेत गांधी जयंती साजरी होणार

या भेटीदरम्यान राष्ट्रपती जो बायडेन यांनी पुढील आठवड्यात येणारी गांधी जयंत साजरी करण्यात येणार असल्याची माहिती दिली. पुढील आठवड्यात आम्ही गांधी जयंती साजरी करणार आहोत. गांधीजींचा अहिंसेचा संदेश आज पहिल्यापेक्षा अधिक पटीने महत्वाचा आहे, असं बायडन म्हणाले.

पंतप्रधान मोदींकडून बायडेन यांचे आभार

बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी जो बायडेन यांचे आभार मानले. मोदी म्हणाले की, मी आणि माझ्या प्रतिनिधीमंडळाचं जोरदार स्वागत केल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. यापूर्वीही आपल्याला चर्चा करण्याची संधी मिळाली होती आणि त्यावेळी आपण भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांबाबत आपलं व्हिजन सांगितलं होतं. आज आपण भारत-अमेरिका संबंधांसाठी आपलं व्हिजन लागू करण्याबाबत पहिलं पाऊल टाकलं आहे.

मोदी आणि बायडेन यांच्यात व्यापारावर चर्चा

त्याचबरोबर बायडेन यांच्या भेटीदरम्यान मोदी म्हणाले की, मी पाहतोय की या दशकात तुमच्या नेतृत्वात आपण जे बीज लावू ते भारत आणि अमेरिकेसह संपूर्ण जगातील लोकशाही देशांसाठी उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर भारत आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये व्यापार हा महत्वाचा घटक आहे. या दशकात आपण एकमेकांना पूरक होऊ शकू. अमेरिकेकडे अशा अनेक गोष्टी आहेत ज्याची भारताला गरज आहे. तर भारताकडेही अनेक गोष्टी आहेत ज्या अमेरिकेच्या उपयोगी येतील. या दशकात व्यापार एक प्रमुख क्षेत्र असेल, असंही मोदी यावेळी म्हणाले.

‘भारत-अमेरिकेचे मैत्रीसंबंध दृढ होणार’

‘आजचे द्विपक्षीय शिखर संमेलन महत्वपूर्ण आहे. आपण या शतकाच्या तिसऱ्या दशकाच्या सुरुवातीला भेटलो आहोत. आपले नेतृत्व निश्चित रुपाने या दशकाला आकार देण्यात महत्वपूर्ण भूमिका पार पाडेल. भारत आणि अमेरिकेतील मैत्री अधिक दृढ होईल’, असंही मोदी यावेळी म्हणाले.

‘या मैत्रीमुळे अनेक जागतिक समस्यांवर उपाय मिळेल’

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘मला पूर्ण विश्वास आहे की भारत आणि अमेरिकेचे संबंध अनेक जागतिक समस्यांच निवारण करण्यासाठी मदतीचे ठरतील. वास्तवात 2006 मध्ये मी सांगितलं होतं की 2020 मध्ये भारत आणि अमेरिका जगातील सर्वात जवळचे देश असतील’.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांच्यात जवळपास 100 मिनिटे चर्चा झाली. ठरलेल्या वेळेपेक्षा 40 मिनिटे जास्त ही बैठक झाली. साधारण 10 वाजून 8 मिनिटांनी पंतप्रधान मोदी व्हाईट हाऊसमधून बाहेर पडले. पंतप्रधान मोदी आणि बायडेन यांच्यात झालेली ही बैठक दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत होण्यास सहाय्यभूत ठरेल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!