हाफिज सईदला 10 वर्षांचा तुरुंगवास

बेकायदेशीर निधीप्रकरणी पाकिस्तान कोर्टाचा आदेश

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

लाहोर : बेकायदेशीर निधीप्रकरणी जमात उद दवा संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदला 10 वर्षांचा कारावास सुनावण्यात आला. पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी कोर्टानं ही शिक्षा सुनावली.

गेल्या वर्षी जुलैमध्ये हाफिज सईदला बेकायदेशीर निधीप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टात सुनावणी झाली आणि या वर्षी फेब्रुवारीमध्ये 11 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता आणखी दोन वेगवेगळ्या प्रकरणांत सईदला 10 वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला. सईदचे निकटवर्तीय जफर इक्बाल आणि याह्या मुजाहिद यांनाही साडेदहा वर्षांचा, तर सईदचा मेहुणा अब्दुल रेहमान मक्की याला सहा महिन्यांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला.

लष्कर ए तोयबाशी संबंध

हाफिज सईद चालवत असलेल्या जमात उद दवा संघटनेचा दहशतवादी कारवाया करणार्‍या लष्कर ए तोयबा संघटनेशी संबंध होता. 2008 मधल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात लष्कर ए तोयबाचा हात होता. या हल्ल्यात 166 नागरिकांचा जीव दहशतवाद्यांनी घेतला होता. हाफिज सईद या कटातील मुख्य सूत्रधार असल्याचा भारत सरकारचा आरोप होता. या हल्ल्यात 6 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेने दहशतवादी म्हणून सईदला जाहीर केले होते. त्याशिवाय सईदचा ठावठिकाणा सांगण्यासाठी 10 दशलक्ष डॉलर्सचं बक्षीस ठेवलं होतं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!