ऑलिम्पिक, भाला फेक आणि यंग लीजंड !

कसा आहे भाला फेक खेळाचा प्रवास...

Goan Varta Live | प्रतिनिधी

मेडल जिंकण्याच्या फारशा चर्चेत नसणार्‍या 23 वर्षीय नीरज चोप्राने चक्क गोल्ड मेडल जिंकून 140 कोटी भारतीयांना सुखद धक्का दिला. अवघ्या देशाचा आयकॉन बनून राहिलेल्या नीरजने भारताचा फक्त गोल्ड मेडलचा दुष्काळच संपवला नाही तर जावलीन थ्रो सारख्या बहुतेकांसाठी अज्ञात असणार्‍या खेळाबाबतही कुतूहल चाळवले. अ‍ॅथलेटीक्स ही नेहमीच भारतासाठी कमजोर बाजू राहिली आहे. त्यातही जावलीन थ्रो किंवा हॅमर थ्रो सारखे इव्हेंट तर 99 टक्के भारतीयांनी आयुष्यात एकदाही पाहिलेले नसतात. अशा खेळात देशाला ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवून देउन नीरज इतक्या लहान वयातच स्पोर्टींग लीजंड बनला आहे.

जावलीन थ्रोईंग ज्याला आपण शब्दश: अर्थाने भाला फेक म्हणतो, तो ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वात जुन्या आणि हार्डकोअर खेळांपैकी एक म्हणून ओळखला जातो. ग्रीसमध्ये आयोजित प्राचीन ऑलिम्पिकमध्ये इसवी सन पूर्व 708 मध्ये जावलीन थ्रो चा सर्वप्रथम समावेश करण्यात आला होता. त्यावेळी जावलीन थ्रो चे दोन इव्हेंट होते. पहिला आताप्रमाणे अधिकाधिक अंतर गाठण्याचा आणि दुसरा एखादे टार्गेट हिट करण्याचा.

त्यानंतर 1870 च्या दरम्यान स्वीडन, जर्मनी आणि फिनलंडमध्ये टार्गेट हिट करण्याचा इव्हेंट इलिमिनेट करुन फक्त जास्त अंतराचाच खेळ ठेवण्यास सुरुवात झाली. विशेष म्हणजे अगदी 1890 पर्यंत जावलीन थ्रो मध्ये भाला उभ्या जागेवरुनच फेकण्याचा नियम होता. त्यावेळी आताप्रमाणे 30 ते 40 मीटर धावत येउन पूर्ण ताकदीने भाला फेकण्यास मान्यता नव्हती. त्यानंतर 1899 मध्ये अगदी शॉर्ट रन अप घेउन भाला फेकण्यास परवानगी देण्यात आली. त्याच वर्षी स्वीडनच्या एरिक लेमींगने 49.32 मीटरवर भाला फेकण्याचा पहिला विश्वविक्रम नोंदवला. 1908 च्या मॉडर्न ऑलिम्पिकमध्ये शॉर्ट रन अपसह जावलीन थ्रोईंगचा समावेश करण्यात आला.

1908 तसेच 1912 च्या ऑलिम्पिकमध्ये अर्थातच लेमींगनेच आपली कामगिरी सुधारत 62.32 मीटरचा टप्पा गाठण्यात यश मिळवून गोल्ड मेडल जिंकले होते. त्यावेळी जावलीन थ्रो मध्ये फक्त स्वीडन आणि फिनलंडच्याच खेळाडुंचा भरणा जास्त असे. त्याच दरम्यान टू हँडेड जावलीन थ्रोईंगच्या स्पर्धांचे आयोजन सुरु झाले. टू हँडेड म्हणजे थ्रोअरने एकदा आपल्या डाव्या आणि एकदा उजव्या हाताने भाला फेकायचा. दोन्ही हातांनी कव्हर केलेले अ‍ॅव्हरेज म्हणजे त्याचे फायनल डिस्टन्स. परंतु शारीरिक मर्यादांमुळे या प्रकाराला फारशी लोकप्रियता मिळू शकली नाही. फक्त 1912 च्या ऑलिम्पिकमध्येच टू हँडेड जावलीन थ्रोईंगचा समावेश होता.

टू हँडेड जावलीन थ्रो मध्ये 1917 साली स्वीडनच्या यांगे हॅकनरने 114.28 मीटर इतके अ‍ॅव्हरेज डिस्टन्स कव्हर करण्यात यश मिळवून विश्वविक्रम नोंदवला. 1932 च्या ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या जावलीन थ्रो चाही समावेश करण्यात आला. पुर्वी जावलीन म्हणजेच भाले हे लाकडापासून तयार केलेले असत ज्याचे टोक फक्त मेटलचे होते. परंतु 1950 च्या दशकापासून जावलीन फक्त हलक्या धातूचा बनवला जाउ लागला. ज्यामुळे अधिक डिस्टन्स कव्हर होउ लागले. वू हॉन या जर्मन जावलीन थ्रोअरने 1986 साली या खेळाच्या इतिहासात सर्वप्रथम 100 मीटरर्सचा टप्पा गाठून 104.80 डिस्टन्सचा विश्वविक्रम नोंदवला. जो आजतागायत कायम आहे.

नीरज चोप्राला जागतिक दर्जाचा जावलीन थ्रोअर बनवण्यात याच हॉनचा मोलाचा वाटा आहे. अ‍ॅथलेटीक्स फेडरेशनने हॉनकडे नीरजला प्रशिक्षण देण्याची जबाबदारी दोन वर्षे सोपवली होती. हॉनसारखे क्लास परदेशी प्रशिक्षक नेमणे किती फायदेशीर असते, हे नीरजसह भारताच्या इतर मेडल विनर्सची उदाहरणे पाहून लक्षात येते. ते खेळाडुंना तांत्रिकदृष्ट्या अधिकाधिक निर्दोष आणि मानसिकदृष्ट्या कणखर बनवण्यात खूप मोठे योगदान देतात.

जावलीन थ्रो सारख्या खेळात भुतकाळातील कामगिरीला नव्हे तर त्या दिवशी तुम्ही कामगिरी कशी करता यालाच अधिक महत्व असते. काल फायनलमध्ये यापुर्वी 90 मीटरपेक्षा अधिक डिस्टन्स गाठणारे जर्मनीच्या जोहान्स वेटरसह 6 जावलीन थ्रोअर होते. वेटरची तर वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी तब्बल 98 मीटरची आहे. याउलट नीरज चोप्राने आतापर्यंत कधीही 90 मीटरचा टप्पाही गाठला नव्हता. परंतु काल मात्र नीरजचे 87 मीटरचे अंतरही वेटरसह सगळ्यांनाच भारी पडले आणि भारतीयांसाठी एका नवीन खेळाचा मार्ग प्रशस्त झाला.

– दीपक पाटील

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!