जगाला थक्क करणारी ‘मेडल मशिन्स’

पदकांची लयलूट करणारे असेही खेळाडू...

Goan Varta Live | प्रतिनिधी

क्रीडा जगतातील सर्वोच्च प्लॅटफॉर्म असणार्‍या ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणे हा तो खेळाडू आणि संपूर्ण देशासाठी किती अभिमानाचा क्षण असतो, याचा अनुभव आपण सध्या घेत आहोत. भारतीय टीमने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत 2 सिल्वर आणि 3 ब्राँझ अशी 5 मेडल्स मिळवली आहेत. ही संख्या रिओ ऑलिम्पिकच्या तुलनेत चांगली असली तरी सहभागी 125 खेळाडू आणि 140 कोटी लोकसंख्येचा विचार करता खूपच तोकडी आहे. असे म्हणण्याचे कारण आहे टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी दोन जलतरणपटू. अमेरिकेचा सेलेब ड्रेसल आणि ऑस्ट्रेलियाची एमा मॅकन. या दोघांनीही टोकियो ऑलिम्पिकमध्ये मेडल्सची अक्षरश: लयलूट केली आहे.

24 वर्षीय ड्रेसलने जलतरणामधील वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये तब्बल 5 गोल्ड मेडल्स जिंकली आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये 5 गोल्ड मेडल जिंकण्याची कामगिरी करणारा ड्रेसल हा अमेरिकेचा चौथा जलतरणपटू आहे. त्याच्या आधी लिजंड मायकेल फेल्प्स, मार्क स्पिट्ज आणि मॅट बायोंडी यांनी असा पराक्रम केला होता. कोविडच्या प्रादुर्भावामुळे सरावावर मोठा परिणाम होउनही ड्रेसलने आपले ध्येय गाठलेच. त्याचे वय पाहता तो आणखी 2 ऑलिम्पिक खेळू शकतो. म्हणूनच त्याला दुसरा फेल्प्स म्हणून ओळखले जाउ लागले आहे.

फेल्प्सने 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये निवृत्ती स्विकारली तेव्हा त्याच्या नावावर तब्बल 28 ऑलिम्पिक मेडल्स होती. यात 23 गोल्ड, 3 सिल्वर आणि 2 ब्राँझ मेडल्सचा समावेश होता. इतकी मेडल्स आपल्या संपूर्ण देशानेही आजतागायतच्या सर्व ऑलिम्पिकमध्येही जिंकलेली नाहीत. टोकियोमध्ये ऑस्ट्रेलियाने प्रथमच रशिया, ग्रेट ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स यांना मागे टाकत मेडल्स टॅलीमध्ये चौथे स्थान पटकावले आहे. त्यांनी आतापर्यंत 17 गोल्डसह 41 मेडल्स मिळवली आहेत. या 41 मध्ये 7 मेडल्स एकट्या एमा मॅकनची आहेत. एमाने जलतरणात 4 गोल्ड आणि 3 ब्राँझ मेडल्स जिंकून एकाच ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक मेडल्स जिंकणारी महिला बनण्याचा विक्रम नोंदवला.

खास बाब म्हणजे एमाने 5 वर्षांपुर्वी रिओ ऑलिम्पिकमध्येही 1 गोल्ड, 1 सिल्वर आणि 1 ब्राँझ मेडल जिंकले होते. अशा प्रकारे 11 ऑलिम्पिक मेडल्ससह एमा ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी महिला अ‍ॅथलीट बनली आहे. 2024 च्या पॅरीस ऑलिम्पिकमध्ये आपली मेडल्सची संख्या किमान 15 पर्यंत नेण्याचा निर्धार तिने व्यक्त केला आहे.

– दीपक पाटील

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!