जोसेफ बायडेन ज्युनियर… अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष

कमला देवी हॅरिस अमेरिकेच्या ४९व्या उपाध्यक्ष

Goan Varta Live | प्रतिनिधी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून जोसेफ बायडेन ज्युनियर (Joe Biden) आणि अमेरिकेच्या ४९व्या उपाध्यक्ष म्हणून कमला देवी हॅरिस (Kamala Harris) यांनी बुधवारी स्थानिक वेळेनुसार दुपारच्या प्रहरी आपापल्या पदांची शपथ घेतली. अमेरिकेतील या सत्तांतराची प्रतीक्षा अमेरिकेबाहेरीलही कित्येकांना होती. ‘आजचा दिवस अमेरिकेसाठी आणि लोकशाहीसाठी अमूल्य आहे’ असे अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले.

करोनामुळे ४ लाख अमेरिकींचा झालेला मृत्यू, लाखोंवर कोसळलेले बेरोजगारीचे संकट, उद्योगांची झालेली वाताहत, अमेरिकेमध्ये कधीही नव्हता इतका उफाळलेला वंशभेद आणि वर्णभेद अशी निराशाजनक, भीतिदायक परिस्थिती बायडेन-हॅरिस यांच्या आधीच्या प्रशासनाच्या बेफिकीर कारभारामुळे निर्माण झालेली आहे. या परिस्थितीवर आश्वासक फुंकर घालण्याचा प्रयत्न बायडेन यांनी त्यांच्या संयत परंतु निर्धारपूर्वक भाषणातून केला. अमेरिकेने यापूर्वीही संकटे पाहिली. पण कित्येक संकटे एकाच काळात आलेली नव्हती. अशा वेळी ऐक्य हेच आपले प्रभावी शस्त्र बनू शकते, असे बायडेन म्हणाले. ६ जानेवारी रोजी ट्रम्प यांच्या गुंडांनी ज्या इमारतीवर विकृत हल्ला चढवला, त्याच इमारतीत पार पडलेला हा सोहळा लोकशाहीप्रेमींसाठी आश्वासक ठरला.

अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी बायडेन यांना, तर अमेरिकी सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या लॅटिन-वंशीय न्यायमूर्ती सोनिया सोटोमायर यांनी कमला हॅरिस यांना शपथ दिली. ७८ वर्षांचे बायडेन हे अमेरिकेचे आजवरचे सर्वात वयोवृद्ध नवनियुक्त अध्यक्ष ठरले. तर ५६ वर्षीय कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला, तसेच आफ्रिकी-भारतीय वंशाच्या उपाध्यक्ष ठरल्या.

मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शपथविधी समारंभास अनुपस्थित राहिले. मावळते उपाध्यक्ष माइक पेन्स हे मात्र उपस्थित होते. याशिवाय बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू. बुश, बराक ओबामा हे माजी अध्यक्षही सपत्नीक उपस्थित होते. लेडी गागा, जेनिफर लोपेझ अशा अनेक कलाकारांची उपस्थिती या सोहळ्याचे वैशिष्टय़ ठरले. बायडेन यांचे भाषण भारतीय वंशाचे सहायक विनय रेड्डी यांनी लिहिले होते. करोनाच्या प्रादुर्भावामुळे या समारंभात तुलनेने कमी उपस्थिती होती. कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. डेमोक्रॅटिक पक्षाच्या धोरणांशी सुसंगत अशा मुखपट्टय़ांचा वापर आणि अंतरनियम पालनाबाबतची जागरूकता लक्षणीय होती.

बायडेन यांनी ट्रम्प यांच्या कार्यकाळातले निर्णय रद्द केलेत. या निर्णयांची यादी…

> करोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी अध्यादेश जारी

– सर्वसामान्यांना जास्तीत जास्त प्रमाणात आर्थिक मदत देण्यासंदर्भातील घोषणा

– पॅरिस हवामानबदल करारामध्ये अमेरिका पुन्हा सहभागी

– वर्णद्वेष संपवण्यासंदर्भातील महत्वाचा निर्णय

– अमेरिका आणि मॅक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याचा निर्णय रद्द केला. या प्रकल्पाला पुरवण्यात येणारा निधी थांबवण्यात आला

– जागतिक आरोग्य संघटनेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय. ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या सभासदांमधून अमेरिका बाहेर पडत असल्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय रद्द करण्यात आलाय.

– ट्रम्प प्रशासनाने मुस्लीम आणि आफ्रिकन देशांवर घातलेली बंदी हटवण्यात आली

– विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कर्जाचे हफ्ते भरण्यास सप्टेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली. यामुळे शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.