‘या’ जगप्रसिद्ध टेनिसपटूला 11 लाखांचा दंड

French Open 2021 स्पर्धेतून घेतली माघार

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: यंदाच्या वर्षातील दुसरं ग्रॅण्ड स्लॅम फ्रेंच ओपनमध्ये झालेल्या वादानंतर जगप्रसिद्ध टेनिसपटू नाओमी ओसाकाने माघार घेतली आहे. त्याआधी तिला मॅच रेफरीने 15 हजार डॉलर्सचा दंड देखील ठोठावला होता. त्यानंतर नाओमीने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे दोन कारण आहेत. शिवाय नाओमीने ट्वीट करून आपण या स्पर्धेतून माघार का घेत आहोत याचं कारणही सांगितलं आहे. 

नियम मोडल्याने ठोठावला दंड

23 वर्षीय जपानी युवा स्टार टेनिसपटू नाओमी ओसाकाने 30 मे आधी झालेल्या सामन्यामध्ये विजय मिळवला होता. या विजयानंतर तिला नियमानुसार पत्रकार परिषदेला उपस्थित राहाणं बंधनकारक होतं. हा नियम मोडल्यामुळे रेफरीने तिच्यावर 15 हजार डॉलर्सचा (साधारण 11 लाख रुपये) दंड ठोठावला आहे. 

मानसिक प्रकृतीमुळे माध्यमांशी बोलणं टाळलं

याच दरम्यान स्वित्झर्लंडचा दिग्गज रॉजर फेडररने सुमारे 500 दिवसानंतर पहिल्या ग्रँड स्लॅम सामन्यात विजयासह सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी 4 वेळा ग्रँड स्लॅम जिंकणारी नाओमी ओसाकाने 27 मे रोजी जाहीर केले की मानसिक प्रकृतीमुळे या वेळी स्पर्धेतील सामन्यानंतर ती माध्यमांशी बोलणार नाही.

हेही वाचाः ट्विटरविरोधात गुन्हा; चुकीची माहिती दिल्याचा आरोप

नाओमी अनुपस्थित असल्यानं आकारला दंड

नाओमीने यासंदर्भात काही दिवसांपूर्वी तिथल्या मॅनेजमेंट आणि स्पर्धेतील अधिकाऱ्यांना तसं पत्राद्वारे लेखी लिहून देखील कळवलं होतं. तरी देखील रविवारी सामन्यानंतर तिला माध्यमांशी बोलण्यासाठी उपस्थित राहावं लागेल असं सांगण्यात आलं होतं. नाओमी अनुपस्थित असल्यानं तिला हा दंड आकारण्यात आला. 

हेही वाचाः चक्रीवादळात घरांचे नुकसान

म्हणून ती माध्यमांशी बोलणं टाळतेय

इतकच नाही तर तिला चारही ग्रँड स्लॅमद्वारे इशारा देण्यात आला आहे. अशा पद्धतीनं जर नियम मोडला तर तिला काढून टाकण्यात येईल असंही सांगण्यात आलं. या सगळ्या वादामुळे आता नाओमीने स्वत:च स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ओसाका गेल्या काही दिवसांपासून तणावाशी झुंज देत आहे. 23 वर्षीय जपानी स्टारने सांगितले की, 2018 मध्ये प्रथमच यूएस ओपन जिंकल्यापासून ती मानसिक तणावाशी झुंज देत आहे आणि त्याला सामोरे जाण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे ती माध्यमांशी बोलण्याचंही टाळत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!