Myanmar coup| म्यानमारमध्ये सत्ता पालट

आंग सान सू की यांना अटक, लष्कराच्या हाती देशाची सत्ता

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्यानमार: म्यानमारमधील लष्कराने बंड केले असून सत्ता ताब्यात घेतली आहे. म्यानमार लष्कराने देशाची नेता आंग सान सू की यांना अटक केली आहे. म्यानमारमध्ये एक वर्षासाठी आणीबाणी लागू करण्यात आल्याची घोषणा लष्कराने टीव्हीवर केली. माजी जनरल आणि उपराष्ट्रपती मिंट स्वे यांना कार्यकारी राष्ट्रपती म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. त्यांना लष्कर प्रमुखाचा दर्जाही देण्यात आला आहे.

विरोध चिरडण्यासाठी रस्त्यांवर सैन्य तैनात

लष्कराने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर होणारा विरोध चिरडण्यासाठी रस्त्यांवर सैन्य तैनात करण्यात आलं असून फोन लाईन बंद ठेवण्यात आल्या आहेत. याआधी एनएलडी चे प्रवक्ते मयो न्यूट यांनी सांगितले की, राष्ट्रपती आंग सान सू की आणि पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांना लष्कराने सोमवारी सकाळी छापेमारी करून अटक केली आहे. आपल्यालादेखील लवकरच अटक करतील अशी भीती मयो यांनी व्यक्त केली.

एनएलडी पक्षाला बहुमत

म्यानमारमध्ये झालेल्या निवडणुकीत आंग सू की यांच्या एनएलडी पक्षाला बहुमत मिळाले होते. त्यानंतर आज म्यानमारमध्ये संसदेची बैठक होणार होती. राजधानीसह इतर शहरांमध्येही लष्कर तैनात करण्यात आले आहेत. तर, काही तांत्रिक कारणास्तव वाहिनीवरील कार्यक्रम प्रसारण करण्यास असमर्थ असल्याचे सरकारी वाहिन्यांनी सांगितले आहे. म्यानमारमध्ये लष्कर सत्ता ताब्यात घेणार असल्याची चर्चा सुरू होती. संविधानाचे संरक्षण आणि संविधानाचे पालन करणार असल्याचे रविवारी लष्कराने स्पष्ट करत सत्ता उलथवून टाकण्याच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. म्यानमारमध्ये १९६२ मध्ये लष्कराने सत्ता हाती घेतली होती. त्यानंतर ४९ वर्ष लष्कराचे नियंत्रण होते.

निवडणुकीत झालेल्या गैरप्रकाराच्या तक्रारीवर कारवाई न झाल्यास लष्कर कारवाई करेल असा इशारा संसदेच्या नव्या सत्रापूर्वीच देण्यात आला होता. मागील आठवड्यातच लष्कराच्या प्रवक्त्यांनी सत्ता पालट होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारली नव्हती. त्यानंतर राजकीय तणाव वाढीस लागला होता. संविधानाचे पालन न केल्यास संविधानच मागे घेण्याची धमकी लष्कराच्या कंमाडर-इन-चीफने दिली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर कमांडर-इन-चीफ संविधानाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न करत होते, अशी सारवासारव लष्कराच्या अधिकाऱ्यांनी नंतर केली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!