भारतीयांच्या हत्येने अमेरिका पुन्हा हादरली

गोळीबारात आठ जणांचा मृत्यू, शीख समुदायातील चौघे

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: अमेरिकेतील इंडियानापोलीस शहरात झालेल्या गोळीबारात शीख समुदायातील चौघा जणांचा मृत्यू झाला. फेडएक्स फॅसिलिटीबाहेर गुरुवारी रात्री झालेल्या गोळीबारात आठ जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी आहेत. बीडमधील रुद्रावार दाम्पत्याच्या हत्या-आत्महत्या प्रकरणाचं गूढ कायम असताना भारतीयांच्या हत्येने अमेरिका पुन्हा हादरली.

गोळीबारात आठ जणांचा मृत्यू

भारतीय वंशाच्या अमेरिकन शीख समुदायातील व्यक्तींचा गोळीबारात 8 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला अमेरिकेतील भारतीय दुतावासाने दुजोरा दिला. “इंडियानापोलीस पोलिसांनी गोळीबारातील मृतांची ओळख पटवली आहे. पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत केली जाईल. आम्ही पीडित कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत” असं स्थानिक पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

अमेरिकन युवकाची गोळीबारानंतर आत्महत्या 

19 वर्षीय तरुणाने फेडएक्स फॅसिलिटीबाहेर गुरुवारी रात्री गोळीबार केला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी स्वतःवर गोळी झाडली. ब्रँडन स्कॉट होल अशी आरोपीची ओळख पटली आहे. तो इंडियाना राज्याचा रहिवासी आहे. होलने केलेल्या गोळीबाराचं कारण अद्याप स्पष्ट नाही. आरोपीसह एकूण नऊ जणांनी या दुर्घटनेत प्राण गमावले.

अमेरिकेत आशियाई समुदायावर होणाऱ्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मार्च महिन्यात अटलांटातील दोन मसाज पार्लरमध्ये आठ जणांची हत्या करण्यात आली होती. त्यामध्ये सहा आशियाई-अमेरिकन महिलांचा समावेश होता. त्यामुळे हेट क्राईमबद्दल काळजी व्यक्त केली जात आहे. अमेरिकेत सध्या पाच लाख शीख समुदायाचे नागरिक असल्याची माहिती आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!