वय, धर्म, ख्याती हे सगळं दुय्यम लग्नासाठी, साळवेंकडे बघा आणि शिका

हे लग्न ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लंडनमधील चर्चमध्ये पार पाडलं.

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : विधीज्ञ आणि माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले आहेत. 28 ऑक्टोबर म्हणजेच काल त्यांनी लंडनमधील चर्चमध्ये कॅरोलिन ब्रॉसार्डशी विवाहबद्ध झाले. हे या दोघांचंही दुसरं लग्न आहे. 65 वर्षीय हरीश साळवे यांनी या वर्षाच्या सुरुवातीला पत्नी मीनाक्षी साळवे यांना घटस्फोट देऊन 38 वर्षांचा संसार मोडला. हरीश-मीनाक्षी साळवे यांना साक्षी आणि सानिया या दोन मुली आहेत.

कॅरोलिन 56 वर्षांच्या असून त्या व्यवसायाने कलाकार आहेत. त्यांना एक मुलगीही आहे. एका कला प्रदर्शनात हरीश साळवे आणि कॅरोलिन ब्रॉसार्ड यांची भेट झाली होती. यानंतर या दोघांच्या भेटी वाढल्या. नंतर घट्ट मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनीही बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला

हे लग्न ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लंडनमधील चर्चमध्ये पार पाडलं. चर्चमधील या छोटेखानी विवाह समारंभात केवळ 15 लोक सहभागी झाले होते. ज्यात दोघांचे कुटुंबीय आणि काही खास मित्रपरिवार सहभागी होता.

हरीश साळवेंची कारकीर्द

हरीश साळवे हे देशातील प्रख्यात वकील आणि ब्रिटनमधील क्वीन्स कौन्सिल आहेत. भारत सरकारने सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. वकिलीमध्ये त्यांची कारकीर्द जबरदस्त होती. त्यांनी अनेक हायप्रोफाईल खटले लढले आणि जिंकलेही. यामध्ये कुलभूषण जाधव, रतन टाटा-सायरस मिस्री वाद, सलमान खानचं हिट अँड रन प्रकरण, वोडाफोनचा कर वाद यांसारख्या मोठ्या खटल्यांचा समावेश आहे. माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या विनंतीवरुन त्यांनी पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद असलेल्या कुलभूषण जाधव यांचा खटला लढला. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी केवळ एक रुपया मानधन घेतलं होतं.

हरीश साळवे यांना ब्रिटन आणि वेल्सच्या न्यायालयात महाराणीचे वकील म्हणूनही नियुक्त केलं आहे. ज्यांनी वकिलीमध्ये कौशल्य प्राप्त केलंय अशाच वकिलांना हा मान मिळतो.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!