वर्क फ्रॉम होम करत असाल तर हे वाचाच!

वर्क फ्रॉम होमचे जसे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. काय आहेत फायदे आणि तोटे?

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

शांताराम वाघ : निवृत्त कर्मचारीदेशभर 23 मार्च रोजी लाकडाउन सुरू झाल्यानंतर सर्वच शुकशुकाट झाला. कारखाने बंद झाले. रेल्वे, बस वाहतूक बंद झाली. सर्वच कर्मचारी मग ते सरकारी असो कि खाजगी घरी बसले. शाळा बेमुदत बंद झाल्या. साहजिकच सर्वच ठिकाणी करोनामुळे जीवन ठप्प झाले त्याचा परिणाम अर्थचक्रावर झाला. हे संकट केवळ भारतातच नव्हे तर जगातील दोनशेपेक्षा जास्त देशात कमी अधिक प्रमाणात सारखेच होते. साथीच्या अगोदर घरून काम करणाऱ्यांची संख्या कमी होती. आयटी क्षेत्रातील कर्मचारी आपल्या कार्यालयात कामाला प्रत्यक्ष जात होते. अपवादात्मक परिस्थितीतच घरून काम होत होते. पण लॉकडाउनमुळे या क्षेत्रात अनेक बदल झाले. एकतर सर्वच कारभार बंद ठेवणे किंवा कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यासाठी परवानगी देणे एवढेच दोन पर्याय आयटी क्षेत्रापुढे होते. त्यामुळे बहुसंख्य संस्थांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास परवानगी दिली. याचे अनेक फायदे तोटे आस्थापना आणि कर्मचारी यांना सोसावे लागत आहेत.

आस्थापनांची स्थिती

आस्थपनांच खर्च वाचला. अनेक ठिकाणी कार्यालयांसाठी जागा भाड्याने किंवा कराराने घेतल्या होत्या. त्या सोडून देण्याचे अनेक आस्थापनांनी ठरविले. बऱ्याच ठिकाणी कर्मचाऱ्यांना कँटीन भत्ता दिला जात होता. घरून काम करण्यास परवानगी दिल्यामुळे तो बंद करण्यात आला. अनेक कर्मचारी कंपनीची वाहने जाण्या-येण्यासाठी वापरात होते. हा भत्ताही अनेक ठिकाणी बंद झाला. वाहन कर्मचाऱ्यांना दुसरे रोजगार शोधावे लागले. अनेक कर्मचाऱ्यांना संगणक कामासाठी घरी द्यावे लागले. घरून काम करण्यासाठी काही पद्धती निशिचत कराव्या लागल्या. काही नियम घालण्यात आले. गेल्या सुमारे सहा महिन्यांचा अनुभव जमेस धरता अनेक कंपन्यांनी घरून काम करण्यास कायमची परवानगी कर्मचाऱ्यांना दिली आहे. भारतातील आरपीजी इंटरप्रायजेस या कंपनीने आपल्या सेल्समधील कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी घरातून काम करण्यास परवानगी दिली आहे. कर्मचाऱ्यांसाठी असा निर्णय घेणारी आरापीजी ही पहिली कंपनी आहे. जे कर्मचारी मशीनवर काम करीत नाहीत व ज्यांना तंत्रज्ञान व्यवसायात क्लायंटला भेटण्यासाठी जबाबदारी नाही, ते करोनाचे संकट संपल्यानंतर सुद्धा कोठूनही काम करू शकतील, असे असे आरपीजी कंपनीचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते काम करण्याचे नवीन मार्ग अवलंबण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. त्यामुळे आस्थापनांची उत्पादकता वाढेल.

कर्मचाऱ्यांची स्थिती

घरून काम करण्यामुळे कर्मचाऱ्यांचा कामावर जाता येतानाच वेळ वाचू लागला. अनेक कर्मचारी स्वतःच्या वाहनाने ये- जा करीत होते. त्यांचा इंधनखर्च वाचला. पण अनेक ठिकाणी त्यासाठी मिळणारी भत्त्ते बंद झाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने पैशाच्या बाबतीत स्थिती जैसे थे राहिली. ऑफिसमध्ये जे कामाचे वातावरण असते ते घरी नसते. ऑफिसमध्ये अनेक सहकारी असतात. त्यांच्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणात कामाचा ताण कमी होतो. शिवाय अनेक बाबतीत निर्णयासाठी अवलंबून राहावे लागते. याशिवाय घरातील कौटुंबिक वाद विवाद घडू शकतात. अनेक ठिकाणी हे समोर आले आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या शारीरिक हालचाली कमी झालेल्या आहेत. एका बातमीनुसार अनेकांना बैठ्या जीवनशैलीमुळे अनेक मानसिक आजारांना सामना करावा लागत आहे. शिवाय घरी असल्यामुळे घरातील अनेक कामे करावी लागतात.

अहवाल काय सांगतो?

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मुंबईमध्ये सुमारे 41 लाख कर्मचारी काम करीत आहेत. त्यापैकी सुमारे 1600 कर्मचाऱ्यांशी चर्चा करून नाईट फ्रँक इंडिया या संस्थेने काही निष्कर्ष काढले आहेत. त्यानुसार 41 लाख कर्मचाऱ्यांमध्ये 1600 ही संख्या कमी असली तरीही तो सॅम्पल सर्व्हे आहे. जवळ जवळ 94 टक्के कर्मचारी घरातून काम करण्यास कंटाळले आहेत. अनेक कर्मचाऱ्यांनी कामावर लक्ष केंद्रित करणे अवघड जाते. याशिवाय इंटररनेटचा स्पीड मिळत नाही. पैशाची बचत होते हे खरे आहे. अनेक कर्मचाऱ्यांना हार्डवेअरच्या अडचणी सुद्धा उद्भवतात. वाहने कमी झाली. त्यामुळे अर्थातच वातावरण स्वच्छ आणि शुद्ध होऊ लागले. प्रदूषण कमी झाले आहे

एकूणच घरातून काम आणि ऑफिसमधून काम या दोन्ही काम करण्याच्या स्वरूपात काही फायदे तोटे आहेत. पण, आपण करोना साथीमुळे आतातरी घरून काम हाच सर्वोत्तम पर्याय आहे. शेवटी त्याच्याशीच जुळवून घ्यावे लागणार आहे, हे विसरता कामा नये. घरातून काम करताना ज्या अडचणी येतील त्या दूर करून यंत्रणा कार्यक्षम करणे हेच हाती आहे. करोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतरच यावर पुनर्विचार करता येईल. आजतरी शिक्षण क्षेत्रातही ऑनलाईन काम करावे लागत आहे. त्याशिवाय पर्याय नाही.

(लेखक निवृत्त कर्मचारी आहेत.)

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!