ओमायक्रॉनला किती गांभीर्यानं घ्यावं? एम्सचे डॉ. रणदीप गुलेरिया सांगतात…

कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची वैज्ञानिक आधारावर चाचणी करणे आवश्यक

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या विषाणूमुळे जगभराची चिंता आता चांगलीच वाढली आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी होतो ना होतो तोच ह्या नव्या प्रारुपाने डोकं वर काढल्याने सध्या भीतीचं आणि काळजीचं वातावरण आहे. मात्र या विषाणूचं स्वरुप काय आहे, त्याची लागण झाल्यास परिणाम काय होतील अशा प्रश्नांची उत्तरं दिली आहेत दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी.

ओमायक्रोनचे ३० हून अधिक म्युटेशन्स

डॉ. गुलेरिया म्हणाले, ओमायक्रॉन नावाच्या नवीन प्रकाराबद्दल जी काही माहिती उपलब्ध आहे, ती अनेक शक्यता दर्शवते, परंतु कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची वैज्ञानिक आधारावर चाचणी करणे आवश्यक आहे. डॉ. गुलेरिया यांनी रविवारी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ओमायक्रोनचे ३० हून अधिक म्युटेशन्स झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे म्युटेशन्स किंवा बदल विषाणूच्या स्पाइक प्रोटीन प्रदेशात झाले आहेत. डॉ गुलेरिया म्हणाले की, विषाणूच्या स्पाइक प्रोटीनच्या क्षेत्रामध्ये म्युटेशन्स झाल्यामुळे, या प्रकारात अशी क्षमता विकसित होऊ शकते ज्यामध्ये तो रोग प्रतिकारशक्तीला हरवू शकतो.

लसी त्यावर तितक्या प्रभावी नसतील

गुलेरिया पुढे म्हणाले की अशा परिस्थितीत जगातील सर्व कोविड लसींचा आढावा घ्यावा लागेल कारण बहुतेक लसी स्पाइक प्रोटीनच्या विरूद्ध प्रतिपिंडे विकसित करतात आणि त्या आधारावर ही लस कार्य करते. आता या प्रदेशात ओमिक्रॉनचे उत्परिवर्तन होत आहे, म्हणजेच रूप बदलत आहे, तेव्हा अनेक लसी त्यावर तितक्या प्रभावी नसतील.

प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळला विषाणूचा नवीन प्रकार

विषाणूचा हा नवीन प्रकार या महिन्यात प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळून आला, त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेला याची माहिती देण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या आठवड्यात करोना विषाणूचा हा नवीन प्रकार चिंतेची बाब असल्याचं सांगत त्याला ओमायक्रॉन असे नाव दिले. संस्थेने एक निवेदन जारी केले होते की या प्रकारात अनेक म्युटेशन्स होत आहेत आणि त्यातून पुन्हा संसर्ग होण्याचा धोका असल्याचे प्राथमिक संकेत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!