शाळांमध्ये मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतर बंधनकारक!

सिद्धार्थ कांबळे | प्रतिनिधी
पणजी : राज्यातील दहावी आणि बारावीचे नियमित वर्ग २१ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर शिक्षण खात्याने शाळांबाबतची नियमावली जारी केली आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांनी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबतच्या सूचना नियमावलीद्वारे देण्यात आल्या आहेत.
शाळा परिसर तसेच वर्ग खोल्यांचे नियमित निर्जंतुकीकरण करण्यात यावे. वर्गात प्रवेश करताना विद्यार्थी, शिक्षकांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी करावी, प्रत्येक वर्गात १२ पेक्षा अधिक विद्यार्थी नसावे. दोन भागांत वर्ग भरवण्यास परवानगी असेल. दोन विद्यार्थ्यांच्या आसनांत सहा फूटांचे अंतर असावे, विद्यार्थी आणि शिक्षकांनी मास्क, सॅनिटायझरचा नित्यनेमाने वापर करावा, आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधता यावा यासाठी शाळांमध्ये आरोग्य खात्याचा हेल्पलाईन क्रमांक लावावा, वर्ग, स्टाफरूम, ग्रंथालय आदी ठिकाणच्या साहित्याला स्पर्श करण्याअगोदर शिक्षकांनी हातांचे निर्जंतुकीकरण करावे, शाळा व्यवस्थापनाने थर्मल गन, थर्मल स्कॅनर तसेच ऑक्सिमीटरची व्यवस्था करून द्यावी, हाऊस किपिंग तसेच स्वच्छतेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे प्रशिक्षण देण्यात यावे, वयोवृद्ध, विविध आजार असलेल्या तसेच गरोदर महिला शिक्षकांनी अधिक काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांच्या थेट संपर्कात येऊ नये, असे निर्देश नियमावलीद्वारे देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी उपलब्ध केल्या जाणाऱ्या वाहनांचे वारंवार निर्जंतुकीकरण करावे. वाहनांतून प्रवास करताना विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक अंतर राहील, याची काळजी घ्यावी. याशिवाय शाळा परिसरात वावरत असताना विद्यार्थी व शिक्षकांनी शारीरिक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे, असेही नियमावलीत म्हटले आहे.