‘क’ जीवनसत्त्वाचा अतिरेक नको!

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : ‘क’ जीवनसत्त्व (व्हिटामीन सी) शरीराची सर्वांगिण वाढ, विकास आणि झीज भरून काढण्यासाठी गरजेचं असतं. सर्वसाधारणपण, निरोगी प्रौढ व्यक्तीला दररोज ६५ ते ९० मिलिग्रॅम ‘क’ जीवनसत्त्वाची गरज असते. मात्र, त्याचा अतिरेक घातक ठरू शकतो. ‘क’ जीवनसत्त्वाच्या अतिसेवनामुळे होणार्या दुष्परिणामांची माहिती घेऊ.
‘क’ जीवनसत्त्वयुक्त पूरक औषधं म्हणजे सप्लिमेंट्सच्या अतिरेकामुळे पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी निर्माण होतात. दिवसभरात २००० मिलिग्रॅमपेक्षा अधिक क्षमतेची ‘क’ जीवनसत्त्वयुक्त पूरक औषधं घेतल्यास जुलाब, मळमळणं, अॅसिड रिफ्लक्ससारख्या समस्या उद्भवू शकतात.
‘क’ जीवनसत्त्व शरीराला लोह शोषून घ्यायला मदत करतं. या जीवनसत्त्वाच्या अतिसेवनामुळे शरीर लोहही अधिक प्रमाणात शोषून घेईल. लोहाच्या अतिप्रमाणामुळे यकृत, हृदय, थायरॉइड, स्वादुपिंड तसंच मज्जासंस्था यांना नुकसान पोहचू शकतं.
‘क’ जीवनसत्त्वाच्या अतिसेवनामुळे मूतखड्याचा धोका वाढतो. हे जीवनसत्त्व ऑक्सालेटच्या रुपात मूत्रावाटे शरीराबाहेर टाकलं जातं. ‘क’ जीवनसत्त्व अधिक प्रमाणात घेतल्यास मूत्रातल्या ऑक्सालेट या घटकाचं प्रमाण वाढून खडे किंवा स्फटिक तयार होण्याची शक्यता वाढते.
‘क’ जीवनसत्त्वाचं अतिसेवन टाळण्यासाठी सप्लिमेंट्स घेऊ नयेत. लिंबू, संत्र, मोसंबी, टोमॅटो, पेरु अशा ‘क’ जीवनसत्त्वाच्या नैसर्गिक स्रोतांवर अवलंबून राहिल्यास या घटकाचं अतिसेवन टाळता येतं.