‘ युज हार्ट टू कनेक्ट ‘

जागतिक हृदय दिनानिमित्त जागतिक हृदय संघटनेचा महत्वपूर्ण संदेश

अर्जुन धस्के | प्रतिनिधी

हृदयविकारासंबंधित जनजागृती करण्याचा दिवस म्हणून २९ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जगभरामध्ये साजरा करतात. या दिवसाला जागतिक हृदय दिवस असे संबोधतात. या उपक्रमामध्ये हृदयविकाराचे प्रतिबंधात्मक उपाय आणि या विकाराचा जागतिक पातळीवर होणारा परिणाम यांचा समावेश होतो. जागतिक हृदय संघटना (World heart Federation W.H.F.) आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिवसाला 1999 मध्ये मान्यता मिळाली. जागतिक हृदय संघटनेचे अध्यक्ष (1997-99) आंतोनियो लुना (Antonio Bayes de Luna) यांच्या संकल्पनेतून हा वार्षिक उपक्रम राबवण्यात आला.

उपक्रमाच्या सुरुवातीला सप्टेंबर महिन्यातील अखेरचा रविवार हा जागतिक हृदय दिवस म्हणून ठरवण्यात आला. त्यानुसार 24 सप्टेंबर 2000 रोजी जागतिक हृदय दिवस प्रथमच साजरा केला गेला. सन 2011 पासून 29 सप्टेंबर हा जागतिक हृदय दिवस म्हणून घोषित करण्यात आला.

जागतिक आकडेवारीनुसार हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे. अधिकतर व्यक्ती हृद् रोहिणी विकार किंवा हृदयविकाराचा झटका आल्याने मरण पावतात. असंतुलित आहार, व्यायामाची कमतरता, धुम्रपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता, हवाप्रदूषण ही हृदयविकाराची महत्त्वाची कारणे आहेत.

हृदयविकारासंबंधित माहिती तसेच प्रतिबंधात्मक उपाय याबद्दल चर्चा, फलक किंवा माहिती पत्रिका याद्वारे 29 सप्टेंबर या दिवशी जनजागृती केली जाते. आंतरराष्ट्रीय हृद् रोहिणी संशोधन संस्था आणि वैद्यकीय समुहांद्वारे शास्त्रीय बैठक आणि चर्चा आयोजित केल्या जातात. तसेच जागतिक हृदय ‍दिवसानिमित्त शैक्षणिक कार्यक्रम आणि आरोग्य शिबिरे घेतली जातात. संतुलित आहार, व्यायाम यांद्वारे हृदयविकाराला प्रतिबंध होऊ शकतो, याबाबत माहिती दिली जाते.

प्रत्येक वर्षी जागतिक हृदय संघटनेद्वारे कार्यक्रमाची रूपरेखा (Theme) उद्धृत केली जाते. प्रथम वर्षी शारीरिक सक्रियता (Physical activity) या रूपरेषेला अनुसरून जनसामान्यांमध्ये माहितीचा प्रसार करण्यात आला. 2003 मध्ये ‘स्त्री आणि हृदयविकार’ ही रूपरेषा ठरवण्यात आली. याद्वारे स्त्रियांमध्ये उद्भवणाऱ्या हृदयविकाराची कारणमीमांसा आणि उपचार यांबाबत माहिती देण्यात आली. 2008 मध्ये ‘हृदयविकाराची शक्यता’ याचे मोजमापन करण्याबाबत (Know your risk) रूपरेषा आखण्यात आली. याद्वारे व्यक्तिसापेक्ष हृदयविकार होण्याच्या संभावनांचे मूल्यमापन करण्यात आले. 2019 मध्ये स्वत:च्या आणि इतरांच्या हृदयाची काळजी घेण्याबाबत (My Heart, Your Heart) रूपरेषा योजण्यात आली. यावर्षी ‘युज हार्ट टू कनेक्ट’ असा संदेश यानिमित्तानं देण्यात आलाय.

अशा पद्धतीने संतुलित वजन, निरोगी हृदयासाठी आवश्यक जीवनशैली तसेच व्यवसायाच्या ठिकाणी हृदय निरोगी राखण्यासाठी पूरक वातावरण निर्मिती अशा अनेक महत्त्वपूर्ण रूपारेखांना वाहिलेले कार्यक्रम देखील जागतिक हृदय दिवस या दिवसाच्या निमित्ताने आखण्यात येतात.

जागतिक हृदय दिन हा कौटुंबिक, शासकीय, सामाजिक पातळीवर हृदयांच्या आरोग्यासंबंधी जनजागृती पसरवण्यासाठी साजरा केला जातो. वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्या मते (C.V.D.) धुम्रपान, डायबिटीस, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, प्रदुषण यांमुळे हृदयासंबंधी आजार वाढत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू हृदयासंबंधी आजारांमुळे होतो.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!