नव्या कोविड इस्पितळामुळे इएसआयवरील भार कमी

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
मडगाव : दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे कोविड इस्पितळात रूपांतर करण्यात आलेले आहे. जिल्हा इस्पितळात १५० जणांवर उपचाराची सोय करण्यात आली असून इएसआय कोविड इस्पितळातील प्रकृती स्थिर असलेल्या व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना नव्या कोविड इस्पितळात हलवण्यात येत आहे. त्यामुळे इएसआय इस्पितळात खाटा रिक्त होऊन गंभीर रुग्णांना जागा उपलब्ध होत आहे. मंगळवारपर्यंत एकूण १३ रुग्णांना नव्या कोविड इस्पितळात आणण्यात आले होते.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे रूपांतर शनिवारी कोविड इस्पितळात करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्यानंतर इएसआय कोविड इस्पितळातील सौम्य व मध्यम लक्षणे असणार्या व प्रकृती काहीशी स्थिर असणार्या रुग्णांना नव्या इस्पितळात आणण्यात आले आहे. यामुळे इएसआय इस्पितळात अत्यवस्थ अवस्थेतील रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाटा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी नव्या कोविड इस्पितळासाठी आणखी २०० खाटा मागवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आगामी काळात १५० खाटा असलेल्या इस्पितळात ३५० खाटांची सोय केली जाणार आहे.
डॉ. सुनंदा आमोणकर व डॉ. राजेश पाटील यांच्याकडे नोडल अधिकारी म्हणून कोविड इस्पितळाची जबाबदारी असणार आहे. सध्या इस्पितळात अतिदक्षता विभागाची उभारणी केलेली आहे. यानंतर गंभीर रुग्णांसाठी सखोल चिकित्सा विभाग (आयटीयू) व अति अवलंबित विभागाची (एचटीयू) उभारणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. कोविड रुग्णालयात रूपांतर केल्यानंतर व नवे इस्पितळ असल्याने सर्व व्यवस्था बसण्यासाठी निदान दहा दिवसांचा अवधी आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय अधिकार्यांनी व्यक्त केले आहे.
- नियमावलीच्या कडक पालनाचे धोरण
नव्या कोविड इस्पितळासाठी कडक नियमावली पाळण्यात येणार आहे. रुग्णासोबत त्याच्या नातेवाईकाला इस्पितळात प्रवेश दिला जाणार नाही. रुग्णासोबत असलेला अटेंडन्ट रुग्णाच्या तब्येतीवर देखरेख ठेवून काही जाणवल्यास वैद्यकीय अधिकार्यांना त्याची माहिती देणार आहे. कोविड इस्पितळात दाखल केलेल्या रुग्णांची तब्येत खालावल्यास त्याला बांबोळी येथील गोमेकॉच्या इस्पितळात हलवण्यात येणार आहे. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील बाह्यरुग्ण तपासणीतही करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्यालाही रुग्णालयात दाखल करून घेत उपचार केले जाणार आहेत.
रुग्ण सुश्रूषेसाठी ७० कर्मचार्यांची नेमणूक
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळ व गोवा आरोग्य सेवा संचालनालयाच्या माध्यमातून ४५ वैद्यकीय अधिकारी व रुग्णांची सुश्रूषा करण्यासाठी जिल्हा इस्पितळात ७० कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नवे व्हेंटिलेटर, एचएफएनओ मशिन, आयव्ही यांसह अत्यावश्यक मशिन व औषधांची सोय करण्यात आलेली आहे.
वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्यांच्या निवासाची सोय
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे कोविड इस्पितळात रूपांतर केल्यानंतर याठिकाणी कार्यरत असणार्या वैद्यकीय अधिकार्यांना राहण्यासाठी कोलवा येथील कोलवा रेसिडन्सी ताब्यात घेण्यात आली आहे. रुग्णांची सेवा करणार्या व्यक्ती व मल्टी टास्क कर्मचार्यांसाठी कोलवा येथील दोन हॉटेल्समध्ये सोय करण्यात आलेली आहे. रुग्ण, वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांसाठी जेवणाची सुविधा करण्यात आलेली आहे.