नारायण राणे करोनामुक्त

Goan Varta Live | प्रतिनिधी
कणकवली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी करोनावर पूर्णतः मात केली आहे. लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन आज, सोमवार दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ते मुंबई येथील आपल्या निवासस्थानी परतले.
नारायण राणे यांना करोना संसर्ग झाल्याचे वृत्त कळताच त्यांची प्रकृती बरी व्हावी म्हणून महाराष्ट्रातून कार्यकर्ते, हितचिंतक यांच्याकडून शुभेच्छा दिल्या जात होत्या. त्या सर्व हितचिंतकांचे राणे कुटूंबाच्या वतीने माजी खासदार नीलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांनी आभार मानले आहेत.
1 ऑक्टोबर रोजी राणे यांना कोविड-19ची लागण झाली. आपल्याला करोनाची लागण झाली असून उपचार सुरू आहेत, अशा आशयाचं ट्विट राणे यांनी केलं होतं.
नारायण राणे हे महाराष्ट्रात, विशेषत: कोकणात मास लिडर म्हणून ओळखले जातात. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. करोनाच्या महामारीतही फिल्डवर सक्रिय असल्यामुळे त्यांचा अनेकांशी रोज संबंध येत असतो. यातूनच त्यांना करोनाबाधा झाली असावी, अशी शक्यता आहे.
1 ऑक्टोबर रोजी, ”माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईल.” असं ट्विट राणे यांनी केलं होतं.