मडगावातील बायोमेडिकल कचर्याचं दुखणं वाढलं

Goan Varta Live | प्रतिनिधी
मडगाव : मडगाव आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातील करोनाबाधितांची संख्या दरदिवशी ४५०च्या आसपास आहे. त्यातील अनेक करोनाबाधितांपैकी अनेकजण गृहविलगीकरणाचा पर्याय निवडत आहेत. मात्र, यादी उपलब्धतेचे कारण देत मडगाव पालिकेकडून गृहविलगीकरणातील बाधितांचा कचरा गोळा केला जात नाही. या समस्येचे निराकरण न केल्यास कचरा कामगारांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे.
राष्ट्रीय हरित लवादाच्या सूचनांनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी गृहविलगीकरणात असलेल्या बाधितांना पिवळ्या रंगाच्या पिशव्या पुरवण्यात याव्यात व त्याची उचलही करण्यात यावी. बायोमेडिकल कचर्याची उचल करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली असली तरी मडगाव पालिकेला पालिका क्षेत्रातील गृहविलगीकरणातील नागरिकांची यादी मिळत नसल्याचा दावा केला जात आहे. मडगावातील करोनामुक्त होणार्यांची संख्या जास्त असली तरीही गेल्या काही दिवसांत ४५०च्या आसपास करोनाबाधितांची संख्या असल्याचे आरोग्य विभागाच्या माहितीनुसार दिसून येते.
एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण असताना त्यातील निम्मे रुग्ण लक्षणेविरहित व गृहविलगीकरणात राहत असल्यास त्यांचा कचरा गोळा करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून मडगाव पालिकेचीच राहते. पालिकेतील अधिकार्यांच्या मते कोविडबाधितांची यादी उपलब्ध होत नसल्याने करोनाबाधित असलेल्या घरांचा शोध घेउन कचरा उचल करणे शक्य होत नाही. मडगाव पालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या अधिकार्यांकडून समन्वय राखत याविषयी चर्चा होणे आवश्यक आहे. या गंभीर समस्येवर तत्काळ उपाययोजना न झाल्यास ही समस्या गंभीर बनू शकते.
अशी आहे व्यवस्था; पण…
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर राज्यातील करोनाबाधितांची यादी स्थानिक स्वराज्य संस्थांना उपलब्ध होण्यासाठी एका पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे. या पोर्टलवर लॉगइन करून स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या क्षेत्रातील गृहविलगीकरणात किती करोनाबाधित असून त्यांच्या घरांची व संपर्क क्रमांक मिळण्याचीही सोय करण्यात आलेली आहे. या पोर्टलद्वारे सर्व ठिकाणी काम केले जात असताना मडगाव पालिकेकडूनही त्याचे पालन होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी मडगावातील कोविडबाधितांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आल्यानंतर त्यांचा बायो मेडिकल कचर्याची उचल करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची असल्याचे म्हटले आहे. मडगाव पालिकेकडून बायोमेडिकल कचरा उचल करण्यासाठी पथकाची निर्मिती केली असतानाही ते गृहविलगीकरणातील करोनाबाधितांच्या घरापाशीही जात नसल्याचे दिसून येतेय.
कचरा कामगारांना धोका शक्य
मडगाव पालिका क्षेत्रातील गृहविलगीकरणातील कोविडबाधितांना पिवळ्या पिशव्या देऊन विशेष पथकाद्वारे रुग्णांचा बायोमेडिकल कचरा गोळा न करण्यात आल्यास कचरा गोळा करणार्या कामगारांना याचा धोका पोहोचू शकतो. पालिकेचे सफाई कामगारांकडून घराघरातील कचरा गोळा केला जातो. रुग्णांना पिवळ्या पिशव्या न दिल्यास करोनाबाधितांचा बायोमेडिकल कचरा काळ्या पिशव्यांतूनच या कामगारांकडे दिला जाऊ शकतो. असे प्रकार घडल्यास कचरा गोळा करणार्या कामगारांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.