वेळीच ओळखा शरीराचा धोक्याचा अलार्म…

अजय लाड | प्रतिनिधी
पणजी : वय वाढू लागल्यावर शरीरात बदल घडू लागतात. अनेक आजारांची सुरूवात होते. या आजारांचं निदान वेळीच झालं तर रोगमुक्त होता येतं. आजाराचं वेळीच निदान होण्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करून घेणं गरजेचं आहे. तिशीनंतर उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टरॉल यासह इतरही चाचण्या करून घ्यायला हव्यात. अशाच काही उपयुक्त आरोग्य चाचण्यांविषयी…
हृदयविकार…
हृदयविकार कोणत्याही वयात होऊ शकतो. सध्याचं धकाधकीचं जीवन, आहाराच्या चुकीच्या सवयी हृदयविकाराला निमंत्रण देतात. हृदयविकाराची काही लक्षणं दिसू लागतात. हा धोका वेळीच ओळखण्यासाठी ईसीजी तपासणी करून घ्यायला हवी. ईसीजी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिग्राम. या चाचणीमुळे भविष्यातला हृदयविकाराचा धोका ओळखता येतो. काही उपाययोजना किंवा जीवनशैलीत बदल करून हृदयविकाराला आळा घालता येतो.
जनुकीय चाचण्या…
भविष्यातल्या व्याधींचा धोका वेळीच ओळखण्यासाठी जनुकीय चाचण्या करून घेता येतील. जनुकीय चाचण्यांमुळे डीएनएमधले बदल टिपता येतील. कॅन्सरचा धोका ओळखता येईल. बाळाचा विचार करत असाल तर जनुकीय चाचण्या दिशादर्शक ठरू शकतात. या चाचण्यांमुळे तुमच्या बाळाचं आरोग्यही उत्तम राहू शकतं. काही जनुकीय चाचण्या खूप उपयुक्त ठरू शकतात.
कोलेस्टरॉलची पातळी
लिपिड प्रोफाइल चाचणीमुळे कोलेस्टरॉलची पातळी कळते. चांगल्या आणि वाईट कोलेस्टरॉलची पातळी कळल्यानंतर हृदयाच्या आरोग्याची कल्पना येऊ शकते. तिशीनंतर साधारण दोन वर्षांनी संपूर्ण लिपिड प्रोफाइल चाचणी करून घ्यायला हवी. हृदयविकार, स्थूलपणा, मधुमेह यांचा कौटुंबिक इतिहास असेल तर नियमित लिपिड प्रोफाइल चाचणी खूप उपयुक्त आणि प्रतिबंधात्मक ठरू शकते. वाईट कोलेस्टरॉलची पातळी कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
यकृताचं आरोग्य जपा
यकृताच्या चाचण्याही करून बघायला हव्यात. यकृताचं आरोग्य खूप महत्त्वाचं असतं. शरीरातली रसायनं, प्रथिनं आणि ट्रायग्लिसराइड्सची तपासणी करून यकृताच्या आरोग्याची माहिती घेतली जाते. यामुळे हेपिटायटिससारख्या विकारांचा धोका कमी होऊ शकतो किंवा वेळीच उपचार होऊ शकतात. तिशीनंतर यकृताची नियमित चाचणी करायला हवी.
पॅप स्मिअर, कोलनोस्कोपी
पॅप स्मिअर तसंच कोलनोस्कोपी या चाचण्याही गरजेच्या आहेत. पॅप स्मिअर ही चाचणी महिलांसाठी अत्यंत गरजेची आहे. तिशीनंतर या चाचण्या नियमितपणे करणं गरजेचं आहे. या चाचण्यांमुळे सर्व्हिकल कॅन्सर तसंच इतर घातक आजारांचा धोका वेळीच लक्षात येतो आणि त्या दृष्टीने उपाय करता येतात. कोलनोस्कोपी ही चाचणी पुरुषांसाठी गरजेची आहे. या चाचण्या पन्नाशीनंतर केल्या तरी चालत असलं तरी तिशीनंतर केल्यास घातक व्याधींचा धोका वेळीच लक्षात येऊ शकतो. कुटुंबात कलोन कॅन्सरचा इतिहास असेल तर ही चाचणी करून घेणं खूप गरजेचं आहे.