शरीरातील दोषांनुसार करा व्यायामाची निवड

यश सावर्डेकर | प्रतिनिधी
पणजी : खरं तर शरीर कायम निरोगी आणि तंदुरुस्त रहाण्यासाठी व्यायाम गरजेचा आहे. त्यासाठी चालणं, धावणं, नृत्य, एरोबिक्स, योगासनं असे अनेक प्रकारचे व्यायाम केले जातात. शरीराला कोणत्याही प्रकारचा व्यायाम चालतो, असं आपल्याला वाटतं. पण, शरीरातल्या दोषांनुसार व्यायामाची निवड करायला हवी, असं आयुर्वेद सांगतं. याबाबत विस्ताराने जाणून घेऊ.
वातदोष असणाऱ्यांनी घावी ही काळजी…
वातदोष असणारे लोक मुळातच उत्साही असतात. त्यांना व्यायाम करायला आवडतं. त्यांना नृत्य, कार्डिओ, धावणं असे गतीमान व्यायामप्रकार भावतात. मात्र, या लोकांची देहयष्टी बारीक असते. त्यांची पचनशक्तीही कमकुवत असते. तसंच त्यांचं वजनही कमी असतं. त्यामुळे वातदोष असणार्यांनी कमी वेग असणार्या व्यायामप्रकारांची निवड करायला हवी. लंजेस, स्क्वॅट्स, रेझिस्टन्स बँड ट्रेनिंग हे व्यायामप्रकार वातदोषांसाठी योग्य ठरतात. योगासनं तसंच कमी तीव्रतेचे व्यायामप्रकारही चालून जातात.
पित्ताचा त्रास असेल, तर…
पित्त आणि अग्नी यांचा खूप जवळचा संबंध आहे. या लोकांचं शरीर अधिक उष्ण असतं. त्यांची शारीरिक क्षमता उत्तम असते. तसंच बांधाही मध्यम असतो. या लोकांना खेळाची प्रचंड आवड असते. त्यांना शरीराला ताण देणारे व्यायाम आवडतात. मात्र, या लोकांनी आरामदायी तसंच तुलनेने सोपे व्यायामप्रकार करणं गरजेचं आहे. पित्तामुळे उष्णता वाढत असल्यामुळे या लोकांनी उष्ण तसंच आर्द्र जागेत व्यायाम करू नये. यीन योगा, पिलेट्स, पोहणं, चालणं असे व्यायाम करता येतील.
कफ असेल, तरीही करा व्यायाम
कफ दोषाचा संबंध पाणी आणि पृथ्वीशी असतो. कफ दोष असणारे लोक तब्येतीने चांगले असतात. त्यांची शारीरिक क्षमताही उत्तम असते. पण, आळशीपण, यामुळे त्यांचं वजनही लवकर वाढतं. कफ प्रवृत्तीच्या लोकांना व्यायामासाठी उद्युक्त करणं खूप कठीण असतं. या लोकांनी तंदुरुस्त रहाण्यासाठी जलदगती व्यायाम करायला हवेत. कफ दोष असणारे लोक कोणताही व्यायाम बराच काळपर्यंत करू शकतात. त्यांना झुंबा, कार्डिओ तसंच इतर वेगवान व्यायामप्रकारांची निवड करता येईल.