कोरोना लस घेतल्यावर 20 दिवसांनीही दिसली ‘ही’ लक्षणं तर सावधान

सरकारनं दिला महत्त्वाचा इशारा

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्लीः संपूर्ण जगाला वेठीला धरणाऱ्या कोविड-19 विषाणूचा संसर्ग आता कमी होत असल्याचं दिसतंय. जगभरातील अनेक देशांमध्ये सार्वजनिक व्यवहार सुरळीत होत आहेत. ही परिस्थिती आणखी सुधारण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणावर होणं आवश्यक आहे. भारतात सरकार लसीकरणावर भर देत आहे. लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतर लसीकरण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र मिळत आहे.

हेही वाचाः क्रूरतेचा कळस! तालिबान्यांनी कुटुंबीयांसमोरच गर्भवती महिला पोलिसावर झाडल्या गोळ्या

लहान मुलं वगळता सर्वांनाच सध्या लस दिली जात आहे आणि सरकारच्या सगळ्या यंत्रणा त्यासाठी कार्यरत आहेत. शाळा सुरू होण्याची शक्यता असल्याने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लस देण्यासाठी कोविन पोर्टलवर सरकारने विशेष व्यवस्था निर्माण केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशातील 67.72 कोटी नागरिकांना लसीचा किमान एक डोस दिला गेला आहे. लसीकरण पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना त्यांच्या आरोग्याबाबत काही लक्षणं दिसून येत आहेत. पण याबाबत घाबरायचं कारण नाही असं आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारने या लक्षणांसंबधी माहिती जारी केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सूचना केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाच्या ‘कोविड न्यूज बाय एमआयबी’ या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार कोणत्याही लसीचा डोस घेतल्यानंतर 20 दिवसांत दम लागणं, छातीत दुखणं, उलटी होणं किंवा सातत्याने पोटात दुखणं, धुरकट दिसणं, सातत्याने जोराने डोकं दुखणं, अंग दुखणं, सुई टोचलेल्या ठिकाणी रक्ताच्या खुणा जाणवणं, चक्कर येणं यासारखी लक्षणं दिसली तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असा सल्ला या ट्विटच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

हेही वाचाः शेळ्या सांभाळणाऱ्या अनिसाची राज्याच्या टीममध्ये निवड

सर्व कोविड-19 प्रतिबंधक लसी आरोग्यदृष्ट्या सुरक्षित

उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे संचालक डॉ. शुचिन बजाज म्हणाले,‘ आपल्या देशात ज्या कोविड प्रतिबंधक लसी दिल्या जात आहेत त्या सगळ्या पूर्णपणे सुरक्षित आहेत. आतापर्यंत तरी लस घेतल्यानंतर कुणालाही फार गंभीर दुष्परिणाम जाणवल्याची माहिती मोठ्या प्रमाणात मिळालेली नाही. जर कुणाला लसीकरणानंतर फार गंभीर लक्षणं दिसली तर त्यांनी तातडीने डॉक्टरांना भेटावं. देशात दिल्या जाण्याऱ्या सर्व कोविड-19 प्रतिबंधक लसी आरोग्यदृष्ट्या सुरक्षित आहेत.’

हेही वाचाः 1 ऑक्टोबरपासून 12 तास करावं लागणार काम, ओव्हरटाइम-PF मध्ये होणार बदल

वयानुसार लसीचे दुष्परिणाम वेगवेगळे

वयानुसार लसीचे दुष्परिणाम वेगवेगळे असू शकतात असं मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. तरुणांच्या आणि ज्येष्ठांच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये अंतर असल्याने त्यांना लस घेतल्यानंतर कमी-जास्त तीव्रतेचे दुष्परिणाम जाणवू शकतात. सामान्यपणे लसीकरणानंतरचे दुष्परिणाम दोन-तीन दिवसांत आपोआप बरे होतात. दीर्घकाळ त्रास झाल्याची उदाहरणं खूप कमी आहेत त्यामुळे सर्वांनी लसीकरण करून घेणं गरजेचं आहे.

हेही वाचाः आधी कर्जबाजारी झाला, मग आपल्याच सहयोगी चांदीच्या व्यापाऱ्याला लुटले

कोविडप्रतिबंधक लस घेतल्यानंतर गंभीर आजार होण्याचं प्रमाण झालं कमी

कोविडप्रतिबंधक लस घेतल्यानंतर गंभीर आजार होणं आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू यांचं प्रमाण खूप कमी झालं आहे. कोविडच्या डेल्टा व्हेरिएंटसारख्या प्रकारांवरही लस परिणामकारक असल्याचं सिद्ध होत आहे. त्यामुळे लसीकरण करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सगळ्यांनी लसीकरण केलं तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवणं शक्य होईल. तिसऱ्या लाटेविरुद्ध लसीकरण हेच मोठं शस्र असल्याचं मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

हा व्हिडिओ पहाः POLITICS | कृष्णा उर्फ दाजी साळकर यांचा हल्लाबोल

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!