तुम्हाला ‘पीसीओडी’ आहे? तर हे नक्की वाचा..

पीसीओडी म्हणजे 'पॉलिसिस्टीक ओव्हरियन डिसिज.'

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः आजकाल महिलांच्या आरोग्याबाबत अनेक समस्या दिसून येत आहेत. मासिक पाळी अनियमित असण्यापासून ते अर्ली मॅनोपॉजपर्यंत अनेक समस्यांना महिलांना सामोरं जावं लागतं. काही वर्षांपासून पीसीओडी ही समस्यादेखील मोठ्याप्रमाणावर डोकं वर काढू लागली आहे. बऱ्याचदा मुलींची मासिक पाळी अनियमित होत असेल तर त्याचे कारण पीसीओडी असं सांगण्यात येतं. यासाठीच पीसीओडीबाबत सर्व गोष्टी प्रत्येक स्रीला माहीत असणं गरजेचं आहे. ‘पीसीओडी’ म्हणजेच (polycystic ovarian diseases) किंवा ‘पीसीओएस’ (polycystic ovarian syndrome). या वेदनादायी त्रासामध्ये मासिकपाळीची अनियमितता, वजन वाढणं, अॅक्ने वाढणं, गर्भधारणेमध्ये दोष निर्माण होणं अशा अनेक समस्या आढळतात. सध्या वंधत्वाचा सामना करणाऱ्या अनेक महिलांमध्ये पीसीओडी हे आई न होण्यामागील प्रमुख कारण आहे. अनेक मुली मासिक पाळी अनियमित असेल तर त्यावर वेळीच उपचार करीत नाहीत. ज्यामुळे भविष्यात त्यांना वंधत्वाला सामोरं जावं लागतं. आजकालच्या आधूनिक काळात पीसीओडीवर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना उपलब्ध आहेत. शिवाय जीवनशैलीमध्ये काही विशिष्ठ बदल करून तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला पीसीओडीची समस्या आहे हे वेळीच लक्षात येणं गरजेचं आहे. मात्र अनेक जणींना याबाबत योग्य मार्गदर्शन मिळत नाही. उपचार करण्यासाठी उशीर झाल्यास त्याचे भयकंर परिणाम भोगावे लागू शकतात. यासाठी आम्ही तुम्हाला पीसीओडीची लक्षणं, कारणं आणि उपचार पद्धती सांगत आहोत, ज्यांचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. त्यावर वेळीच वैद्यकीय उपचार करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवता येतं. मात्र अनेकजणी डॉक्टरांच्या उपचारांपेक्षा घरागुती आणि नैसर्गिक उपचारांना प्रथम प्राधान्य देतायत.

पीसीओडी म्हणजे नक्की काय?

पीसीओडी म्हणजे ‘पॉलिसिस्टीक ओव्हरियन डिसिज’ (Polycystic Ovarian Disease) पीसीओडी या आरोग्य समस्येमध्ये त्या स्त्रीच्या अंडाशयामध्ये गाठी अथवा सिस्ट निर्माण होतात. पीसीओडी हा महिलांमधील एक इन्डोक्राईन विकार आहे. अंडाशयातील सिस्टमुळे त्या महिलेचे स्त्रीबीज निर्माण होण्यात अडथळा निर्माण होतो. एका शारीरिक कार्यात अडथळा आल्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण शारीरिक कार्यावर होऊ लागतो. पीसीओडीमुळे महिलांच्या हॉर्मोन्समधील संतुलन बिघडतं आणि त्यांना हॉर्मोनल असंतुलनाला सामोरं जावं लागतं. साधारणपणे मासिक पाळी सुरू झालेल्या किशोरवयीन मुलींपासून अगदी मनोपॉजपर्यंतच्या म्हणजेच पन्नासीच्या वयोगटातील सर्व महिलांना पीसीओडी या समस्येला सामोरं जावं लागू शकतं.

पीसीओडीची लक्षणं

पीसीओडीची समस्या समजून घेण्यासाठी त्याआधी तुम्हाला त्याची काही लक्षणं माहीत असणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुम्हाला या समस्येवर पटकन उपचार करता येतात. पीसीओडी समस्या असेल तर अचानक वजन वाढणं, अनियमित मासिक पाळी येणं, मासिकपाळी सुरू असताना असह्य वेदना होणं, डोकेदुखी, वंधत्व, अशक्तपणा, केस गळणं, चेहऱ्यावर डाग आणि पिंपल्स, चेहऱ्यावर केस येणं वगैरे.

जीवनशैलीत बदल करून तुम्ही ही समस्या नक्कीच नियंत्रणात आणू शकता.

पीसीओडी असल्यास वजन कमी करण्यासाठी 5 टिप्स

वजन कमी करणं नेहमीच आव्हानात्मक असतं, पण पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमने (पीसीओडी) ग्रस्त असलेल्या स्त्रियांसाठी ते अधिक कठीण असतं. या हार्मोनल समस्येने ग्रस्त असलेल्या जवळजवळ निम्म्या स्त्रियांचं वजन जास्त असतं. ज्यामुळे या आजाराची लक्षणं आणखीनच वाढतात. वजन कमी करण्याचा त्या पुरेसा प्रयत्न करत नाहीत असं नाही, पण प्रत्यक्षात हार्मोनल असमतोलामुळे त्यांचं शरीर अन्न चयापचय करण्याच्या पद्धतीत व्यत्यय आणतं आणि वजन कमी करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणार्या महिलांची अवस्था इतरांपेक्षा अगदी वेगळी असते. त्यामुळे त्यांनी अतिरिक्त प्रयत्न करून या अडथळ्यावर मात करण्यासाठी आपल्या आहाराशी जुळवून घेणं गरजेचं आहे. विशेषतः पीसीओडीग्रस्त स्त्रियांसाठी वजन कमी करण्यासाठी 5 टिप्स दिल्यात.

कार्बचं सेवन कमी करा

कार्ब हे एक आवश्यक मॅक्रोन्युट्रिएंट आहे आणि ते आरोग्यासाठी वाईट नाही. पण पीसीओडीच्या बाबतीत याचा इन्सुलिनच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. या आजाराने ग्रस्त असलेल्या स्त्रियांमध्ये ही एक सामान्य समस्या आहे. विविध अभ्यासांवरून असं दिसून येतं की, पीसीओडी रुग्णांमध्ये शरीरातील चरबी आणि वजन वाढण्याचं एक कारण असू शकतं. वजन कमी करण्यासाठी त्यांना कार्बचं सेवन कमी करावं लागतं आणि त्यांच्या आहारात प्रथिनांचं प्रमाण वाढवावं लागतं.

पौष्टिक स्निग्ध पदार्थ खा

कार्बचं सेवन कमी करताना निरोगी चरबीचं सेवन वाढवा. भरपूर स्निग्ध पदार्थ खा. अवोकाडो, ऑलिव्ह ऑईल, नारळाचं तेल आणि नट बटर यासारख्या आरोग्यदायी स्निग्ध पदार्थांमुळे केवळ तुमचं वजन कमी होण्यास मदत होणार नाही, तर पीसीओएसच्या इतर लक्षणांचंही व्यवस्थापन होईल.

फायबरच्या सेवनावर अधिक लक्ष केंद्रित करा

फायबर तृप्ती वाढवतं आणि दीर्घकाळ पूर्ण ठेवतं. यामुळे तुम्ही अतिखाण्यापासून आणि निरोगी मंचिंगपासून स्वतःला रोखू शकता. भाज्या आणि फळांसारख्या अधिक गुंतागुंतीच्या, उच्च फायबर कार्बमुळे तुमच्या रक्तातील साखर वाढणार नाही आणि तुमचं वजन कमी होण्यासाठी मदत होईल. एका अभ्यासात असं दिसून आलंय, की उच्च फायबरचं सेवन केल्याने इन्सुलिनचा प्रतिरोध कमी होऊ शकतो आणि पीसीओडी असलेल्या स्त्रियांमध्ये पोटाची चरबी जाळण्यास मदत होते.

पोटस्नेही फर्मेंटेड पदार्थ आवश्यक

चयापचय क्रिया आणि वजन टिकवून ठेवण्यासाठी आपले पोटातील जीवाणू महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे तुमचं पोट आणि पचन आरोग्य महत्त्वाचं आहे. पीसीओडीग्रस्त स्त्रियांमध्ये निरोगी पोटाचे जीवाणू कमी असतात, ज्यामुळे वजन कमी करण्याच्या त्यांच्या संघर्षाला हातभार लागू शकतो. दही आणि केफिरसारख्या प्रोबायोटिक्स असलेले जास्त पदार्थ खाल्ल्याने पोटातील चांगल्या जीवाणूंची संख्या वाढण्यास मदत होते आणि वजन कमी होतं.

व्यायाम

व्यायाम न करता वजन कमी करणं निव्वळ अशक्य आहे. पीसीओडीसाठी नेहमी जेवणाच्या वेळेपूर्वी व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामुळे चयापचय क्रिया वाढण्यास मदत होते आणि शरीरात कमी चरबी साठते. उच्च तीव्रतेच्या व्यायामावर अधिक लक्ष केंद्रित करा, ज्यामुळे कमी वेळेत अधिक कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.

पीसीओडी झाला म्हणून घाबरायची गरज आहे. आवश्यक ती काळजी घेतल्यास, आहारात योग्य तो बदल केल्यास, नियमित व्यायाम केल्यास ही समस्या नक्कीच दूर होऊ शकते. ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.’

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!