गणेशोत्सवात कोकणात गेलेल्या २७२ जणांना करोना

१ लाख ३० हजार जणांपैकी ९० हजार जण दोन लसमात्रा घेऊन आलेले

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गेल्या वर्षी कठोर निर्बंधांमुळे गणेशोत्सवानिमित्त कोकणात अनेकांना जाता आले नाही. यंदा तुलनेत निर्बंध शिथिल करण्यात आले. एसटी महामंडळाने मुंबई, ठाणे, पालघर जिल्हा आणि पुणे येथून कोकणासाठी २२०० जादा गाड्या सोडल्या. मध्य आणि पश्चिम रेल्वेनेही सव्वादोनशेहून अधिक विशेष रेल्वे फेऱ्या चालवल्या. याव्यतिरिक्त खासगी बस आणि वैयक्तिक वाहनांतून मोठ्या संख्येने गणेशभक्त गावी गेले. यंदा रत्नागिरी जिल्ह्यात एक लाख ३० हजार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८७ हजार ८३७ जण दाखल झाले.

२७२ जणांना करोनाची लागण

गणेशोत्सवानिमित्त मुंबई, ठाणे, पालघर व अन्य भागांतून कोकणात गेलेल्या गणेशभक्तांपैकी २७२ जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयांकडून देण्यात आली. त्यांच्यावर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यंदा गणेशोत्सवानिमित्त जवळपास दोन लाख १७ हजारांहून अधिक गणेशभक्त कोकणात दाखल झाले होते. त्या तुलनेत करोनाबाधितांचे प्रमाण कमी असल्याचे सांगण्यात आले.

१ लाख ३० हजार जणांपैकी ९० हजार जण दोन लसमात्रा घेऊन आलेले

गणेशोत्सवानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या १ लाख ३० हजार जणांपैकी ९० हजार जण करोना चाचणी करून आणि दोन लसमात्रा घेऊन आलेले होते. ४० हजार जण चाचणीसाठी पात्र होते; परंतु त्यातील साधारण  २० हजार जण १८ वर्षांखालील होते, अशी माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी दिली. उर्वरित २० हजार जणांपैकी १२० जणांना करोनाची लागण झाल्याचे चाचणीत आढळून आले. त्याव्यतिरिक्त ७२ जणांना करोनासदृश लक्षणे होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

खासगी वाहनांतून ८७ हजार ८३७ जण जिल्ह्यात दाखल झाले

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, रेल्वे, एसटी, खासगी वाहनांतून ८७ हजार ८३७ जण जिल्ह्यात दाखल झाले. त्यातील ३० हजार २१६ जणांनी दोन लसमात्रा घेतल्या होत्या. २० हजार जणांचे करोना तपासणी अहवाल नकारात्मक आले. जिल्ह्यात आठ हजार १०४ जण तपासणी न करताच आले. त्यांची आरोग्य चाचणी करण्यात आली असता १५२ जण करोनाबाधित आढळले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!