CORONA UPDATE : सावधान! अँटीबॉडीजविषयी मोठा खुलासा…

Goan Varta Live | प्रतिनिधी
लंडन : आजारातून बरे झालेल्या करोनाबाधितांच्या शरीरातील अँटीबॉडीज लवकर कमी होत असल्यामुळे या रुग्णांना करोनाची बाधा होण्याचा धोका असल्याचा दावा एका ब्रिटीश संशोधकाने केला आहे. अँटीबॉडीज लवकरच कमी होत असल्यामुळे दीर्घकाळापर्यंत रोगप्रतिकार क्षमता असण्याची आशाही संपुष्टात येत आहे. त्यामुळे करोनाच्या आजारावर मात केलेल्या रुग्णांना पुन्हा बाधा होऊ शकत नाही, हा दावा विश्वासार्ह नसल्याचं स्पष्ट झालंय.
साडेतीन लाख लोकांची तपासणी
लंडनमधील इम्पिरिअल कॉलेजच्या एका संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. या संशोधनात 3 लाख 65 हजारांहून अधिकजणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये करोनाच्या संसर्गाला अटकाव करणाऱ्या अँटीबॉडीज दिवसेंदिवस कमी होत असल्याचं समोर आलंय. या संशोधनात सहभागी असणारे प्रा. वँडी बार्कले यांनी सांगितले की, हिवाळ्यात लोकांना बाधित करणारा करोनाच्या संसर्गाची 6 ते 12 महिन्यात पुन्हा लागण होऊ शकते. इम्पिरिअल कॉलेजचे संचालक पॉल इलियॉट यांनी सांगितले की, शरीरात अँटीबॉडीज असलेल्या व्यक्तींची संख्या कमी होत असल्याचे आम्हाला आढळून आले. तरुणांपेक्षा वृद्धांच्या शरीरात अँटीबॉडीज कमी होत असल्याचे दिसून आले.
अँटीबॉडीज तीनच महिने प्रभावी
करोनाच्या उपचारासाठी भारत, अमेरिकेसह काही देशांमध्ये ब्लड प्लाझ्माचा वापर करण्यात येत आहे. नुकत्याच एका संशोधनात शास्त्रज्ञांनी ब्लड प्लाझ्माच्या प्रभावी काळमर्यादेचा शोध लावण्यास यश मिळवले आहे. कॅनडातील क्युबेकमध्ये एका रक्तदान केंद्रातील हेमा-क्युबेकच्या संशोधन पथकाने म्हटले की, करोनाच्या आजाराला मात दिलेल्या व्यक्तींच्या शरीरातील ब्लड प्लाझ्मा हा तीन महिनेच प्रभावी असतो. त्यानंतर जर ब्लड प्लाझ्मा दिल्यास त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. शास्त्रज्ञांनी करोनाला मात दिलेल्या एका रुग्ण्यांच्या गटातून प्लाझ्मा काढला होता. तीन महिन्यातच रक्तातील अँटीबॉडीज नष्ट झाल्याचे त्यांना आढळून आले.
..तरच अँटीबॉडीजचा फायदा
संशोधकांनी सांगितले की, रक्ताच्या नमुन्यातून फक्त 21 दिवसातच अँटीबॉडीजची संख्या कमी झाली. करोनावर मात केलेल्या रुग्णांच्या शरीरातून घेतलेला प्लाज्मा बाधित व्यक्तींना लवकर देणे आवश्यक आहे. जेणेकरून करोनाबाधित रुग्णाच्या शरीरात अँटीबॉडीज वेगाने विकसित होतील.