ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढतेय

भारतात ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अनेक महिला या विकाराला बळी पडत आहेत. जगभरातच स्तनांच्या कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे.

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : दर वर्षी जगातल्या जवळपास दोन दशलक्ष महिलांना स्तनांचा कॅन्सर होतो, असं आकडेवारी सांगते. असं असलं तरी स्तनांच्या कॅन्सरवर उपचार शक्य आहेत. रुग्ण बरा होण्याचं प्रमाणही वाढत आहे. प्रतिबंधात्मक उपायांनी स्तनांच्या कॅन्सरला आळा घालता येऊ शकतो. तसंच वेळेत निदान झाल्याने कॅन्सर पसरण्याचा धोकाही कमी होतो.

बदलत्या जीवनशैलीमुळे स्तनांच्या कॅन्सरचा धोका वाढत चालला आहे. 30 ते 60 या वयोगटातल्या महिलांना हा विकार जडण्याची शक्यता अधिक असते. कमी वयाच्या मुलींनाही स्तनांचा कॅन्सर होऊ शकतो. स्तनांचा कॅन्सर होण्याची अनेक कारणं आहेत. बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, वेळी-अवेळी खाणं, मासिक पाळी लवकर येणं, मुलं उशीरा होणं, मूल होऊ न देणं, स्तनपान न करवणं, हार्मोन्सशी संबंधित औषधं घेणं, गर्भनिरोधक गोळ्यांचं सेवन बराच काळ करत रहाणं यामुळे स्तनांचा कॅन्सर होऊ शकतो. यामागे अनुवंशिक कारणंही असू शकतात. स्तनांच्या कॅन्सरला प्रतिबंध करण्यासाठी सुरूवातीच्या लक्षणांकडे लक्ष द्यायला हवं. स्तनांमध्ये किंवा दंडालगत गाठ जाणवणं, स्तनांमध्ये वेदना होणं, स्तनांमधून द्रव पदार्थांचा स्राव होणं, स्तनांचा आकार बदलणं, स्तनाग्रांना सुरकुत्या पडणं ही या विकाराची लक्षणं आहेत.

असं असलं तरी काही उपायांनी स्तनांच्या कॅन्सरला प्रतिबंध करता येऊ शकतो. स्थूलपणामुळे स्तनांचा कॅन्सर होऊ शकतो. आहारावर नियंत्रण आणि नियमित व्यायाम याद्वारे वजन नियंत्रणात ठेवल्यास स्तनांच्या कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो. स्थूलपणामुळे स्तनांचाच नाही तर इतर कर्करोगही होऊ शकतात. त्यामुळे वजन कमी करणं हा कर्करोगाला आळा घालण्याचा उत्तम उपाय आहे. नियमित आरोग्य तपासणीसोबतच महिलांनी स्वत: स्तनांची चाचणी करून घ्यायला हवी. महिन्यातून एकदा स्तनांची तपासणी केल्यास काही लक्षणं दिसू शकतात. त्यासाठी स्तनांचा आणि स्तनाग्रांचा आकार, रंग याकडे लक्ष ठेवा. यात थोडा बदल जाणवला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. स्तनांमध्ये गाठ जाणवली तरी घाबरून जाऊ नका. प्रत्येक गाठ कॅन्सरची असतेच असं नाही. त्यामुळे तपासणी करून घ्यायला घाबरू नका.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!