आता ‘काँगो तापा’चा धोका…

गुजरातमधील सीमावर्ती भागात तापाची लक्षणे. पालघरनंतर ठाणे जिल्ह्यात सुरक्षेच्या उपाययोजना.

अर्जुन धस्के | प्रतिनिधी

ठाणे : करोनाचा प्रादुर्भाव जगभरात वाढत असताना आता ‘क्रायमिन काँगो हेमोरेजिक फीव्हर’ (crimean congo hemorrhagic fever) या रोगाचा धोका निर्माण होऊ लागला आहे. बाधित जनावरांच्या संपर्कात आल्यास किंवा त्याचे मांस खाल्ल्यास हा रोग मानवाला होतो, असा निष्कर्ष काढत पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभागाने यासंबंधी धोक्याची सूचना देताच ठाणे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. गुजरातमधील सीमावर्ती भागात काँगो तापाची लक्षणे दिसल्याने पालघरपाठोपाठ ठाणे जिल्ह्य़ातही यंत्रणांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

पशुसंवर्धन विभागाकडून गोचिड निर्मूलन कार्यक्रम हाती घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार प्राण्यांवर फवारणी करण्यात येत आहे. तसेच गुजरात राज्यातून पशूंची वाहतूक होणार नाही याकडे लक्ष ठेवले जात आहे. ठाणे जिल्ह्याला करोनाचा विळखा बसला असून दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यात आता गुजरातमधील कच्छ आणि बोताड जिल्ह्यांमध्ये काँगो फीव्हर या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. पशूंवर असलेल्या गोचीड, पिसवा यांमुळे हा आजार होतो, असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. एखाद्या बाधित जनावराच्या रक्ताशी संपर्क झाल्यास किंवा बाधित पशूचे मांस खाल्ल्यास हा आजार बळावत असल्याचे समोर आले आहे.

गुजरातमधून शेळी, मेंढी यांची मोठय़ा प्रमाणात पालघर, ठाणे आणि मुंबईमध्ये वाहतूक होत असते. त्यामुळे पालघरमध्ये इशारा देण्यात आला असून गुजरातमधून येणाऱ्या या पशूंची पालघरच्या तपासणी नाक्यांवर चाचणी केली जात आहे. ठाणे जिल्हा हा पालघर जिल्ह्याला लागून आहे. तसेच गुजरातहून आलेल्या पशूंची पालघर मार्गेच ठाण्यात वाहतूक केली जाते. तपासणी इशाऱ्यामुळे ठाणे जिल्ह्याला सध्या तरी या रोगाचा धोका नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!