गोवा सीमेवर प्रवाशांचं थर्मल स्कॅनिंग

सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे आदेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

सिंधुदुर्ग : कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने, मिशन बिगीन अगेन अंतर्गत महाराष्ट्र शासनाने 23 नोव्हेंबर रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने दिनांक 25 नोव्हेंबरपासून गोवा राज्याच्या सीमेवर कार्यवाही सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अपर पोलीस अधिक्षक तुषार पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद दळवी, उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड, सावंतवाडीचे तहसिलदार राजाराम म्हात्रे, वेंगुर्लाचे तहसिदार प्रविण लोकरे, दोडामार्गचे तहसिलदार श्री खानोलकर, पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक अविनाश भोसले आदींसह अधिकारी उपस्थित होते.

पत्रादेवी, दोडामार्ग येथे पथके

पत्रादेवी येथे महसूल, पोलीस आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाची तीन पथके तैनात करण्याविषयी सूचना यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या. दोडामार्ग येथे दोन आणि सातार्डा, आरोंदा, रेडी आणि आयी या ठिकाणी तपासणीसाठी एक पथक तैनात करण्यात यावे. जिल्ह्यात प्रवेश करतेवेळी प्रवाशांना कमीत कमी वेळ थांबावे लागेल असे नियोजन करावे. थर्मल स्कॅनिंग करावे. तापाची लक्षणे असलेल्या प्रवाशांची अँटिजेन टेस्ट करावी. जर टेस्ट पॉजिटीव्ह आली, तर त्यांना नजिकच्या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवावे, कोविड केअर सेंटरमधील सर्व खर्च हा संबंधित प्रवाशांनी करावयाचा आहे. त्या दृष्टीने महसूल व आरोग्य यंत्रणेने समन्वय साधून काम करावे. बांदा येथील प्रवाशांना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तर दोडामार्ग येथील प्रवाशांना दोडामार्ग ग्रामिण रुग्णालय येथे तपासणीसाठी पावठावे.

रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांचीही तपासणी

रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांचीही रेल्वे स्थानकावर तपासणी करण्यात यावी, त्यासाठी कुडाळ, सावंतवाडी, कणकवली या स्थानकावर आरोग्य पथके तैनात ठेवावीत. गोवा, गुजरात, राजस्थान आणि दिल्ली या राज्यांमध्ये थांबा असलेल्या गाड्यांमधून जिल्ह्यात प्रवेश घेण्यापूर्वी आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह असणे आवश्यक आहे. तसेच सदर अहवाल प्रवाशांनी आपल्या सोबत ठेवावा. सदर आरटीपीसीआर नमुना चाचणी सिंधुदुर्गात प्रवेश करण्यापूर्वी 96 तासांच्या आत झालेली असावी. आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक अहवाल नसलेल्या प्रवाशांच्या शरीराचे तापमान आणि कोवीड – 19 लक्षणांची तपासणी संबंधित रेल्वे स्थानकावर केली जाईल. लक्षणे नसलेल्या प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी दिली जाईल. ज्या प्रवाशांमध्ये लक्षणे दिसतील त्यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येईल. टेस्ट पॉजिटीव्ह आलेल्या प्रवाशांना कोविड केअर सेंटरमध्ये पाठविले जाईल. सीसीसीसह पुढील काळजी घेण्याचा खर्च स्वतः प्रवाशाला उचलावा लागेल.

गोव्यात ये-जा करणाऱ्यांचं थर्मल स्कॅनिंग

विमानाने येणाऱ्या प्रवाशांच्या माहितीसाठी निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी गोवा विमानतळ प्रशासनाशी समन्वय ठेवावा व प्रवाशांची माहिती संबंधित तालुक्यातील तहसिलदार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे द्यावी. दररोज कामानिमित्त व नोकरी निमित्त गोवा येथे जाणारे व येणारे प्रवाशींचे थर्मल स्कॅनिग करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.