गोव्याची उत्तुंग भरारी.. ताकद शिक्षणक्रांतीची खरी !

शिक्षक दिनानिमित्त खास फीचर...

अर्जुन धस्के | प्रतिनिधी

ओळखलंत का सर मला, अशी साद घालणारा, कुसुमाग्रजांच्या कवितेतला तो विद्यार्थी आठवतोय का तुम्हाला…मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणा…या त्याच्या शब्दाशब्दांत व्यक्त होणारा हा आत्मविश्वास आला कुठून? तो आला केवळ शिक्षणामुळं आणि शिक्षकांमुळं. होय, शिक्षण हाच आपल्या जगण्याचा कणा असतो आणि कितीही संकटं आली तरी तो मोडून पडू नये, याचा आत्मविश्वास आपल्यात निर्माण करतो तो शिक्षक. याच शिक्षकांच्या गौरवार्थ दरवर्षी देशभरात 5 सप्टेंबर हा शिक्षकदिन साजरा केला जातो.

गोव्याला केवळ गौरवशालीच नव्हे तर क्रांतीकारक अशी शैक्षणिक परंपरा लाभलीय. क्रांतीकारक याचसाठी की, गोव्याचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी शिक्षणाबाबत अतिशय क्रांतीकारक असे निर्णय घेतले. शेजारच्या काही राज्यांमध्ये असा धाडसी निर्णय होण्यासाठी जिथं काही वर्षांचा कालावधी जावा लागला, तिथं भाऊसाहेब बांदोडकरांनी मात्र हा निर्णय अगदी सुरूवातीलाच घेतला होता, तो म्हणजे प्राथमिक स्तरावर मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा.

पहा खास फीचर…

थोडी आकडेवारी पाहूया. गोवा मुक्तीपूर्वी 176 शाळांमधून 17, 000 मुलं शिक्षण घेत होती. बांदोडकर यांच्या या क्रांतीकारी निर्णयानंतर म्हणजेच 1964-65 मध्ये 719 सरकारी प्राथमिक शाळांमधुन तब्बल 66, 642 इतकी मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आली. ही असते शैक्षणिक क्रांती…हे असतं शिक्षण क्षेत्रातलं परिवर्तन. बिगरसरकारी शाळांचा आकडाही आपण गृहीत धरला तर हा आकडा तब्बल 91, 000 पर्यंत पोहोचला होता.

माध्यमिक स्तरावरही शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल करण्यात आले. महाराष्ट्राच्या धर्तीवर अनुदान पध्दत सुरू करण्यात आली. 1964 – 65 या आर्थिक वर्षाच्या अखेरीस 159 विद्यालयांमध्ये 22,562 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्याअगोदरचा, म्हणजे मुक्तीपूर्वीचा कालावधी पाहिला तर 78 शाळांमध्ये 8000 विद्यार्थी शिकत होते. सुरवातीच्याच आर्थिक वर्षांत चार महाविद्यालये सुरू झाली. त्यात एक फक्त मुलींसाठी होतं. प्रौढांसाठी साक्षरता वर्ग आणि वाचनालयाच्या विकासाची योजनाही या कालावधीत मार्गी लागली.

सर्वात महत्वाचं म्हणजे 1964-65 मध्येच माध्यान्ह आहार हा महत्वकांक्षी प्रकल्प राबवण्यास सुरूवात झाली. शिष्यवृत्ती योजनाही सुरू झाल्या. कमी उत्पन्न असलेल्या घटकांसाठी मोफत शिक्षणाची योजना सुरू झाली. नियोजन मंडळानं दमणसाठी 1964-65 मध्ये कला व विज्ञान महाविद्यालयाला मंजुरी दिली. तांत्रिक शिक्षणासाठी आयटीआय सुरू करण्यासाठी बांदोडकरांनी खुप प्रयत्न केले. दोन वर्षांत अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्याची योजना तयार केली. म्हापशात सरकारी तांत्रिक विद्यालय, मडगावला सरकारी बहुउद्देशीय विद्यालय, आणि दमणसाठी केंद्रीय प्रशिक्षण केंद्राच्या विकासाची योजना तयार करण्यात आली.

या सर्वांच्या मागं बांदोडकरांची शिक्षणाबाबतची तळमळ आणि अथक प्रयत्न होते. गोवा मुक्तीपूर्वी साक्षरतेचं प्रमाण हे 31 टक्क्यांच्या खाली होतं, बांदोडकर यांच्या कारकीर्दीत ही टक्केवारी 45 टक्क्यांच्या पुढं गेली. जोपर्यंत गोमंतकीय योग्य शिक्षण घेत नाहीत, तोपर्यंत कोणतीही प्रगती अशक्य असुन, गोव्याची सामाजिक, आर्थिक सुधारणा यावरच अवलंबुन आहे, असं त्यांचं ठाम मत होतं. त्यांचे शब्द आजही आम्हाला तितकेच महत्वाचे आहेत.

केवळ विचार नव्हे तर प्रत्यक्ष त्यांनी गोव्यातल्या ग्रामीण भागात जावून तिथं शिक्षणाची गंगा पोहोचवली. गावातल्या मोकळया जागा, व्हरांडे, प्रसंगी गुरांचे गोठे साफ करूनही तिथं त्यांनी शाळा सुरू केल्या. प्रसंगी स्वत: गोरगरीबांना आणि शाळांना आर्थिक मदत केली. ते कोणत्याही एका भाषेबद्दल आग्रही नसायचे, स्थानिक लोकांना विचारून त्यांना हवं त्या भाषेत म्हणजेच कोकणी, मराठी आणि कानडीतही शिकवलं जायंच.

सर्वांत महत्वाची बाब म्हणजे गोवा मुक्त झाला, त्यावेळी गोव्यात एकही उच्च शिक्षण संस्था नव्हती. गोव्यातल्या मुलांना धारवाड, पुणे आणि मुंबईला उच्चशिक्षणासाठी जावं लागायचं. हे थोडं खर्चिक काम असल्यामुळं केवळ श्रीमंतांच्याच मुलांना हे उच्च शिक्षण परवडत होतं. ही परस्थिती बदलण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. त्यामुळं त्यांच्या कालावधीत अनेक मोठया संस्था स्थापन झाल्या. यात गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी, गोवा फार्मसी कॉलेज, पणजी, कार्मेल महिला महाविद्यालय, नुवे, एस. एस. धेंपो वाणिज्य महाविद्यालय, पणजी, अभियांत्रिकी महाविद्यालय, फार्मागुडी, एमईएस कला व वाणिज्य महाविद्यालय, झुआरीनगर, व्हीव्हीएम श्री दामोदर वाणिज्य महाविद्यालय, मडगाव, एम. एस. कायदा महाविद्यालय पणजी यांचा प्रामुख्यानं समावेश आहे.

बांदोडकर यांच्याच कारकीर्दीत मुंबई विद्यापीठाशी संलग्न पदव्युत्तर केंद्र पणजीत स्थापन करण्यात आलं. चौथ्या पंचवार्षिक योजनेत युजीसीनं या केंद्रासाठी 20 लाख रूपये मंजुर केले. बांदोडकर असतानाच गोवा विद्यापीठाचा प्रस्ताव पुढं आला. बांदोडकर यांच्या निधनानंतर जरी विद्यापीठाचं स्वप्नं साकारलं असलं तरी त्यांनी त्यासाठी केलेले प्रयत्न विसरता येणार नाहीत. उच्च शिक्षण देणाऱ्या अनेक संस्थांचं यावेळी नियोजन करण्यात आलं आणि त्याचा लाभ घेत अनेक गोमंतकीय, गोव्यातच नव्हे तर देशाच्या उर्वरीत भागात आणि परदेशातही चांगल्या नोकऱ्या मिळवू शकले.

शैक्षणिक आणि बुध्दीमत्तेच्या जगतात आधुनिक गोव्याला आज मोठं मानाचं स्थान आहे. मात्र हे उत्तुंग शिखर आजही बांदोडकर यांच्या बहुमोल शैक्षणिक कार्याच्या पायावर भक्कमपणे उभं आहे. गोव्याच्या शैक्षणिक वाटचालीचा हा इतिहास याचसाठी इथं मांडायचा कारण जे इतिहास विसरतात, ते भविष्य कधीच घडवू शकत नाहीत. आजही आमच्या सर्वसामान्य गोंयकारांच्या अनेक अपेक्षा आहेत. बदलत्या परस्थितीनुसार त्यांच्या शिक्षणाबाबतच्या वेगवेगळया मागण्या आहेत.

शिक्षक, विद्यार्थी यांचं नातं, बदलतं शिक्षणक्षेत्र, नव्या पिढीसमोर असलेली आव्हानं, ऑनलाईन शिक्षणाचा नवा प्रवाह या सर्वांवर आज अनेकांची अनेक मतं आहेत. सरकारकडून वेगवेगळया अपेक्षा आहेत. ऑनलाईन शिक्षणावर भर देणारं सरकार गोव्यातल्या बहुतांश विद्यार्थ्यांपर्यत इंटरनेटही पोहोचवू शकलं नाही, हे वास्तव आहे. ही झाली केवळ एक समस्या. अशा अनेक समस्यांवर उपाय शोधुन त्यावर मात करायची असेल तर आदरणीय भाऊसाहेबांची ही क्रांतीकारक शैक्षणिक वाटचाल आम्हाला एखाद्या दीपस्तंभासारखी सदैव मार्गदशक ठरणार आहे.

आज शिक्षक दिनाच्या निमित्तानं सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं स्मरण केलं जातं. ते आहेच, परंतु त्याही आधी जसं महाराष्ट्रात महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य क्रांतीकारक, पायाभूत आहे, तसंच गोव्याच्या या वाटचालीत आदरणीय भाऊसाहेबांचं शैक्षणिक कार्य तितकंच महत्वपूर्ण आहे. आजचा हा शिक्षकदिन भाऊसाहेबांच्या या कार्याला त्रिवार वंदन केल्याशिवाय साजरा होवूच शकत नाही. नव्या पिढीनं शिक्षक दिनाचा हा नवा संदेश जरूर आपल्या आयुष्यात यशाचा मंत्र म्हणून जपावा, हीच अपेक्षा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!