आयआयटी आंदोलनाला जमीन मालकी हक्काचे व्यापक स्वरूप

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी
पणजी: सत्तरीतील आयआयटी विरोधातील आंदोलनाने आता व्यापक स्वरुप धारण केले आहे. सत्तरीतील 90 टक्के लोकांना जमीन मालकीचा प्रश्न सतावत आहे. मागील कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या जमीन मालकी हक्कावर आयआयटीच्या निमित्ताने पुन्हा एकदा वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांची शेळ मेळावलीत बैठक झाली. बैठकीला मोठी उपस्थिती होती.
सत्तरी तालुक्यात मोकासदार आणि इतर फक्त साधारण 10 टक्के लोकांकडेच जमीन मालकी आहे. इतरांच्या जमिनी या गावठण, वन खात्याच्या अखत्यारीत व अभयारण्याच्या कक्षेत येतात. जरी या जमिनी वन खाते किंवा अभयारण्याच्या कक्षेत आल्या तरी तिथे मागील शेकडो वर्षांपासून लोकांचे अस्तित्व आहे. या जमिनींवर मोठ्या प्रमाणात लोक काजू व बागायतीचे उत्पन्न घेतात.
‘क्लास वन’ जमीन मालकी हक्क द्या
सत्तरी तालुक्यात 90 टक्के लोकांकडे जमीन मालकी नसल्याचा दावा उपस्थित शेतकऱ्यांनी केला. या जमिनी आमच्या पूर्वजांनी राखून ठेवल्यात, त्यांच्यावर आमचाच हक्क आहे असे त्यांचे म्हणणे आहे. जमीन मालकी नसल्याने लोकांना कृषी खात्याच्या योजना घेता येत नाहीत. ज्या जमिनी मागील कित्येक वर्षे आमच्याकडे आहेत, आम्ही त्या कसतो तर मग त्यांची मालकी आम्हाला का मिळू नये असा सवाल शेतकऱ्यांनी केलाय. सरकाने या जमिनी आमच्या नावावर क्लास वन करून द्याव्यात. जमिनी क्लास वन नावावर करुन दिल्यानंतरच पूर्ण मालकी हक्क शेतकऱ्यांना मिळेल, अशी मागणी उपस्थिती शेतकऱ्यांनी केलीय.
पुढील काळात आंदोलन आणखी उग्र
पुढील काळात सत्तरीत जमीन मालकी हक्काचे आंदोलन आणखीन तीव्र होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. तालुक्यातील गावागावात अशा बैठकांचे आयोजन करण्यात येईल. आजपर्यंत सत्तरीतील लोकप्रतिनिधींनी लोकांच्या डोळ्यांना पाणी लावल्याचा आरोप आयोजकांनी केलाय.
काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांबरोबर- गिरीश चोडणकर
शेळ मेळावलीतील शेतकऱ्यांच्या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांनी उपस्थिती लावली. काँग्रेस पक्ष सत्तरीतील शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम असल्याचे आश्वासन त्यांनी दिलेय. सरकारने शेळ मेळावलीतील आयआयटी प्रकल्प रद्द करावा. लोकांचा जमीन मालकीचा प्रश्न आधी सोडविण्याची गरज असल्याचे चोडणकरांनी यावेळी सांगितले. यावेळी काँग्रेसचे वाळपई गटाध्यक्ष दशरथ मांद्रेकर व इतर उपस्थित होते.