‘डोपमाईन ट्रॅप’ पौगंडावस्थेतील मुलामुलींसाठी महत्त्वाचा दस्तऐवज : खलप

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : व्यसनाधीनतेच्या तावडीतून मुक्त होणे कठीण असते. मग ते नशेचे व्यसन असो की अश्लील चित्रफिती पाहण्याचे व्यसन असो. अशा प्रकारचे व्यसन वाढवणारे ‘डोप’ ठिकठिकाणी अस्तित्वात आहेत. प्रसेनजीत ढगे यांच्या “डोपमाईन ट्रॅप” पुस्तकात अशा अनेक सापळ्यांविरूद्ध सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. हे पुस्तक इतके महत्त्वाचे आहे की पौगंडावस्थेतील लैंगिक संक्रमणाच्या काळातील प्रत्येक मुला-मुलीने हे पुस्तक वाचावे, अशा स्वरूपाचा हा दस्तऐवज आहे, असे मत माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप (Ramakant Khalap) यांनी येथे व्यक्त केले.
नोशन प्रेस प्रकाशित “डोपमाइन ट्रॅप” पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात खलप बोलत होते. या समारंभास साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. रंजना फेर्राव, अखिल गोवा पत्रलेखक महासंघाचे अध्यक्ष शशिकांत सरदेसाई, मिनिझेस ब्रागांझा संस्थेचे अध्यक्ष संजय हरमलकर व लेखक प्रसेनजीत ढगे उपस्थित होते.
पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश सांगताना लेखक प्रसेनजीत ढगे यांनी सांगितले की,
कोविड-१९ च्या काळात अबाल वृद्धांसह जगभरातील तरुणाई घरात बंदिस्त झाली होती. या काळात लोकांनी स्वत:ला कुठे, कसे आणि कशात गुंतवून घेतले याचा शोध या पुस्तकात घेतला आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फ़ोन आल्याने त्यांना रिकाम्या वेळैत सेक्सॉलोजी आणि पोर्नोग्राफ़ी जवळची का आणि कशी वाटली, त्याचा शोध म्हणजे हे डोपमाईन ट्रॅप पुस्तक आहे.
“डोपमाईन ट्रॅप” च्या लेखकाने अगदी लहान वयातच एका महत्त्वपूर्ण विषयाचा गंभीरपणे अभ्यास करून चांगले संशोधन सिद्ध केले आहे. कायदा पदवीधर म्हणून त्याने केलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे डॉ. रंजना फेर्राव म्हणाल्या.
शशिकांत सरदेसाई व संजय हरमलकर यांनी पुस्तकाबद्दल मत व्यक्त केले. दीपाली देसाई यांनी सूत्रसंचालन केले.