कोविड-19वर आता ‘लस अस्र’चा हल्ला

Goan Varta Live | प्रतिनिधी
–डॉ. मधू घोडकिरेकर, सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यक विभाग गोमेकॉ
कोविड-19 विषाणूने केलेला प्रहार इतका अनपेक्षित होता की त्याने जगभरच्या भल्याभल्याना गुढग्यावर आणले. या विषाणूने गेले बारा महिने जगाला सळो की पळो करून सोडले. युद्धाचा नियमच असा आहे की योग्य अस्त्र मिळेपर्यंत शत्रू सैन्याला थोपवून ठेवायचे. विषाणूंवर नेमके अस्र म्हणजे त्यावरची लस. शास्त्रज्ञांनीही नऊ महिन्यात लस तयार करून या विषाणूंवर प्रतिहल्ल्याची तयारी केली. या विषयाची थोडी पार्श्वभूमी लक्षात घेऊया.
प्रचलित लसीकरण
प्रत्येक पालकाला आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी सर्वतोपरी काळजी घ्यायची असते. मूल आजारी पडू नये, यासाठी ते काहीही करायला तयार असतात. मुलांच्या निरोगी आयुष्यासाठी लहानपणी होणाऱ्या आजारांवरील लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असते. लसीकरण हा सार्वजनिक आरोग्यक्षेत्रातील सर्वात स्वस्त उपाय आहे. कारण लसीकरणामुळे संभाव्य व्यंग व मृत्यू यांना थेट व परिणामकारक प्रतिबंध करता येऊ शकतो. गेल्या पाच दशकात पाच वर्षांखालील मुलांच्या मृत्यूचा दर २३३ वरून ६३ (दर हजार मुलांमागे) इतका खाली येण्यासाठी लसीकरण हा महत्त्वाचा घटक आहे.
थोडा पूर्वेतिहास…
लस संशोधनात दोन विषाणूंची नावे अग्रक्रमाने घेतली जातात. पहिले नाव घेतले जाते ते एडवर्ड जेन्नर यांचे. 1796 साली त्यांनी देवीच्या विषाणूंवर लस शोधून काढली व तिचा वापर सुरू केला. पुढे दोनशे वर्षे त्यावर अनेक प्रयोग होऊन विसाव्या शतकाच्या मंध्यतरापर्यंत आधुनिक स्वरूपाची लस तयार झाली. सरतेशेवटी 1970 पासून देवीरोगाचा जगातून नायनाट झाल्याचे जाहीर झाले. या बाबतचा इतिहास असही सांगतो की, एडवर्ड जेन्नरने 1796 साली प्राथमिक स्वरूपातील लस बनवली असली, तरी त्याच्याही हजारो वर्षांआधीपासून चीन, आफ्रिका व टर्की येथे याच प्रकारचा उपचार पारंपरिक पद्धतीने व्हायचा. पूढे युरोपियन संशोधकानी त्यावर सखोल अभ्यास केला. देवीच्या लसीला जगाने स्वीकारायला शेकडो वर्षे लागली. पण देवीच्या अनुभवावरून जगाला एका गोष्ट पटली की, लसीच्या वापराने विषाणूचा नायनाट करता येतो. 1510 मध्ये पोर्तुगीजानी गोवा काबीज केल्यावर लगेच 35 वर्षांनी म्हणजे 1545मध्ये देवी मुली गोव्यातील तब्बल आठ हजार मुले देवीच्या रोगाचे बळी पडल्याचे बोलले जाते. पोर्तुगीजाबरोबर ही साथ गोव्यात शिरल्याची शक्यता तेव्हा युरोपिअन संशोधकांनी व्यक्त केली होती.
हजारो वर्षांचा शास्त्रीय अनुभव
दुसरे नाव लुई पाश्चरच्या यांचे. त्याची 1885 सालची रेबीजवरची लस मानवी विषाणू रोगसंशोधनावर क्रांती घडवणारी ठरली. त्यानंतर बॅक्टेरियोलॉजी या क्षेत्राची मोठ्या वेगाने प्रगती झाली. 1930च्या दशकात डिप्थीरिया, टिटॅनस, अँथ्रॅक्स, कॉलरा, प्लेग, टायफाइड, क्षयरोग आणि बरेच काही विरूद्ध अँटीटॉक्सिन आणि लसी विकसित केल्या गेल्या त्या याच काळात. एकविसाव्या शतकात प्रवेश करेपर्यंत रिकॉम्बिनेंट डीएनए तंत्रज्ञान हे नाविन्यपूर्ण तंत्र विकसित झाले व हे तंत्र आता लस संशोधनाचा कणा ठरले आहे. कोविड 19 विरुद्ध लसरूपी शस्र तयार होत आहे ते याच तंत्राच्या आधारे. आज आपण म्हणतो की, दहा महिन्यात लस कशी तयार होऊ शकते? पण त्या मागे हजारो वर्षांचा शास्त्रीय अनुभव व शेकडो वर्षाचे संशोधन प्रयत्न आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
लस निर्मितीची प्रक्रिया
कोविड 19 येईपर्यंत लस तयार करण्याच्या अत्याधुनिक पध्दती जगभर प्रचलित झाल्या आहेत. शिवाय शंभर दोनशे दिवसात या साथीचे रुग्ण जगभर पसरले. त्यामुळे विषाणू रचनेचा अभ्यास करणे सहज शक्य झाले. लस तयार झाली की ती मानवी प्रयॊगासाठी कशी वापारावी, या विषयी जागतिक तसेच प्रत्येक देशासाठीची नियमावली आहे. या नियमावलीच्या परीक्षेत उतरल्यावरच त्या लसीचा मानवी प्रयोग करण्यास परवानगी मिळते. मानवी प्रयोगानंतर मानवी वापरासाठी कोणते निष्कर्ष असावे लागतात, याचीही नियमावली असते, त्याच्या परीक्षेत उतरल्यानंतरच तशी परवानगी मिळते. आज जगभरात तीन चार लसी तयार झाल्या आहेत, त्या पहिल्या दोन टप्प्यातून गेल्या आहे. आता तिसरा टप्प्याच्या पहिल्या पायरीचे पर्व सुरु होत आहे. अशा वेळी ही लस घ्यावी की नको हा पहिला प्रश्न चर्चिला जातो. कारण बहुतेक जणांचा कौल असतो की दुसऱ्याना ती आधी घेऊ द्या, आपण त्यांचं बघून नंतर ठरवू.
जीवनाचा आनंद घ्या, स्वतःचे रक्षण करा!
इंग्लंडच्या आरोग्य खात्याने “जीवनाचा आनंद घ्या, स्वतःचे रक्षण करा” या टॅगलाईनने कोविड-19 लशीकरण माहिती तसेच प्रबोधन पत्रिका जरी केली आहे. त्यात त्यांनी कोविड-19 हा रोग म्हणजे काय , तो कसा होत्तो व त्याचे कसे गंभीर परिणाम असतात यापासून सुरवात केली. त्यांच्याकडे दोन लसी उपलब्ध असून चांगल्या परिणामासाठी 14 ते 28 दिवसांच्या दरम्यान दोन डोस गरजेचे असल्याचे म्हटले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही लस घ्यावीच अशी आग्रहवजा विनंती केली आहे. या शिवाय कोणत्या प्रसंगी लस घेऊ नये, काही कारणास्तव दुसरा डोस ठरल्या दिवशी घेणं अशक्य असल्यास तो कधी घ्यावा, या विषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. लस मुबलक प्रमाणात उपलब्ध होईपर्यंत कुणाकुणाला प्राधान्य देणार, यांचीही यादी जाहीर केली आहे. थोडक्यात सांगायचं झाल्यास भारत सरकारही अशीच माहिती जारी करेल, जेणेकरून नागरिकांना त्या विषयी शंका-कुशंका राहणार नाही.
महत्वाचा संदेश…
वरील पत्रिकेची सांगता “मी लस घेतल्यानंतर माझ्यापासून दुसऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका अजूनही असणार का?” या प्रश्नाला दिलेल्या उत्तराने केली आहे. ते उत्तर म्हणजे एक संदेशच आहे. “या लसी आपल्याला कोविड-19ची बाधा होण्यापासून वाचवेल, किंबहुना गंभीर आजार होण्याची शक्यता तरी कमी करेल. अजून संशोधन बाकी असल्यामुळे लस घेतल्यावर आपल्यापासून दुसऱ्यांना संसर्ग होणारच नाही, हे आत्ताच सांगू शकत नाही. तेव्हा सामाजिक अंतर ठेवणे, मास्क वापरणे व वारंवार हात धुणे हे प्रतिबंधात्मक उपाय चालू ठेवूया” असे ते उत्तर आहे. लस टोचेल तेव्हा टोचेल, हा कोविड 19 मात्र गेले वर्षभर आम्हा सर्वांचे कान टोचून गेला. येणारे नववर्ष तरी होऊ घातलेल्या लसीकरणाचे जगभरात आशादायी निष्कर्ष घेऊन येवो, अशी प्रार्थना करूया.