रिंगणचा अंक विठ्ठल रखुमाईच्या चरणी अर्पण

Goan Varta Live | प्रतिनिधी
सचिन परब | वार्षिक रिंगणचे संपादक | 9987036805 | 9420685183 |
पंढरपूरः संतपरंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणारा आषाढी एकादशीनिमित्त प्रकाशित होणारा पहिला आणि एकमेव वार्षिक अंक रिंगण अखेर पंढरपुरात श्री विठ्ठल- रखुमाईच्या चरणी अर्पण झाला आहे. यंदा संत परिसा भागवतांवर हा विशेषांक तयार करण्यात आला आहे.
पंढरपुरात रात्री लिंबूपाण्यासाठी रांग थांबवली होती. तोवर अंक दाखल झाले होते. पूजा झाल्याबरोबर दोन मिनिटात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी रिंगण विठ्ठलाच्या पायावर अर्पण केले. परिसा हे रुक्मिणीमातेचे परमभक्त म्हणून तिच्याही चरणावर अंक अर्पण केला.

चारेक दिवसात अंक गावोगाव पाठवायला सुरवात होईल. दरवर्षी रिंगण वाचकांपर्यंत पोचायला आषाढीनंतर दहा दिवस तरी लागायचे. यावर्षी एकादशीला काही अंक विक्रेत्यांकडे पोचतील, अशी माहिती रिंगणचे संपादक सचिन परब यांनी दिली.
दरवर्षी एका संताच्या विचारांचा, चरित्राचा आणि प्रभावाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न तरुण पत्रकार आणि जाणकार अभ्यासक यांनी परंपरेचा वेध घेत केलेली ही नवी मांडणी आहे. या अंकाला केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर ठिकठिकाणांहून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. वारकरी, वाचक, अभ्यासक आणि प्रसारमाध्यमांनी या अंकाचं स्वागत केलं आहे. संतपरंपरेचा विचार तरुणांनी तरुणांच्या भाषेत तरुणांपर्यंत पोहोचवण्याची ही एक यशस्वी धडपड आहे.

आत्तापर्यंत प्रकाशित झालेल्या अंकात संत नामदेव, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत निवृत्तीनाथ, संत विसोबा खेचर, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई विशेषाकांचा समावेश आहे.