आरोग्य वार्ता | पावसात संभवतो डेंग्यू, मलेरियासह 5 अन्य घातक आजारांचा धोका, काळजी घ्या !

Goan Varta Live | प्रतिनिधी
वेबडेस्क 20 जुलै | पावसाळा आला की साथीच्या रोगांचा जणू उत येतो. ठिकठिकाणी पाणी आणि घाण तुंबल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढतो. यासोबतच बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शन झपाट्याने पसरू लागते.
हा ऋतू आरोग्यासाठी खूप आव्हानात्मक असतो. पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी लोकांना खूप प्रयत्न करावे लागतात. देशभरात अनेक राज्यांमध्ये पूरसदृश परिस्थितीमुळे आजारांचा धोका आणखी वाढला आहे. या ठिकाणी डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया आणि डासांमुळे पसरणारे आजार उद्भवू शकतात, अशी भीती आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत या ऋतूत आजार कसे टाळता येतील याबाबत पाहू,

पावसाळ्यात व्हायरल आणि बॅक्टेरियाचा संसर्ग झपाट्याने पसरतो. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबते, त्यामुळे डासांचा उपद्रव वाढतो. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया पसरण्याचा धोका वाढतो. याशिवाय टायफॉइड, डायरिया (पोटात जंतुसंसर्ग) हे घाणेरडे पाणी पिण्यानेही समोर येते. या हंगामात व्हायरल ताप आणि सर्दीचे रुग्णही वाढतात. ज्या ठिकाणी पूरसदृश परिस्थिती आहे, तेथे रोगराई पसरण्याचा सर्वाधिक धोका आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने स्वच्छ पाणी प्यावे आणि फक्त ताजे अन्न खावे. या ऋतूमध्ये डासांपासून दूर राहण्याची सर्वाधिक गरज आहे. पावसाळ्यात सावध राहूनच आजारांपासून बचाव होऊ शकतो.
पावसात आजारांपासून कसे वाचावे
या ऋतूत डास आणि पावसाळी कीटकांपासून संरक्षण करणे सर्वात महत्त्वाचे आहे. झोपताना मच्छरदाणी लावावी आणि मच्छरविरोधी क्रीम किंवा तेल वापरावे. याच्या मदतीने तुम्ही डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियाचा धोका कमी करू शकता.
पावसात घरातून बाहेर पडताना सर्वांनी पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत. घराच्या आत आणि आजूबाजूला ठेवलेल्या कुंड्यांमध्ये आणि इतर ठिकाणी पावसाचे पाणी साचू देऊ नका. तसेच कूलरचे पाणी वेळोवेळी बदलत राहा. यामुळे डासांपासून संरक्षण होईल.

या हंगामात जंक फूडपासून दूर राहा. घरात शिजवलेले ताजे अन्नच खा. शिळे अन्न सेवन करू नये. स्वच्छ पाणी प्या. यामुळे तुमचा टायफॉइड होण्याचा धोका कमी होईल आणि पोटाचे संक्रमण देखील टाळता येईल.
पावसाळ्यात तुमच्या आहारात आले, लसूण आणि लिंबाचा समावेश केला पाहिजे, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि चयापचय सुधारते. या ऋतूत गरम पदार्थ खावेत आणि थंड पदार्थ टाळावेत. फक्त ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन करावे.
– ताप आल्यास पॅरासिटामॉल घ्यावे आणि त्याचा फायदा होत नसेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावा. कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नये, अन्यथा परिस्थिती खूप गंभीर होऊ शकते.

महत्वाची टीप : सदर लेख फक्त आरोग्यविषयक जन जागृतीसाठी लिहिला गेलाय. जर कुणालाही वर उल्लेख केलेल्या रोगांपैकी एखाद्या रोगाची लक्षणे आढळून आल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.